नांदेड – जिल्हा स्वीप कक्षाच्या वतीने नांदेड शहरात आज मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली. ‘वोट करेगा, वोट करेगा, सारा नांदेड वोट करेगा’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जिल्हा स्वीप कक्षाच्या प्रमुख तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करून मतदानाचे महत्व मतदारांना सांगण्यात आले. नांदेड महापालिका, जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या मानवी साखळीकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. त्याचवेळी मतदानाबाबत गांभीर्यही वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या भागात मतदानाचे प्रमाण कमी आहे त्या भागावर लक्ष केंद्रित करताना केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने प्राप्त झालेल्या एलईडी व्हॅनमार्फत मतदानाचे जनजागृती केली जात आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वीप कक्षाच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
मंगळवारी आयोजित या उपक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, मनपा शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी, जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त संजय जाधव, सहायक आयुक्त मिर्झा फरहत उल्ला बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड महापालिका, जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या मानवी साखळीत सहभागी झाले होते.