राजकीय

भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीवर तत्कालीन नांदेड महिला काँग्रेसचा वरचष्मा..!

जुन्या निष्ठावंत महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र असंतोष, आम्ही फक्त कामच करायचे काय? संतप्त सवालही उपस्थित 

नांदेड – भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीत नांदेड जिल्ह्यातील आठ महिला पदाधिकाऱ्यांना विविध पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते रविवारी या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या या आठही महिला पदाधिकाऱ्यांना थेट महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाच्या जुन्या निष्ठावंत महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र याबाबत नाराजी पसरली असून आम्ही फक्त कामच करायचे काय? असा संतप्त सवालही समाज माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांना भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी, कविता कळसकर यांना प्रदेश सरचिटणीसपदी, अनिता इंगोले यांना प्रदेश सचिवपदी, ललिता शिंदे बोकारे यांना प्रदेश चिटणीसपदी,  सुमती व्याहाळकर यांनाही प्रदेश चिटणीसपदी तर जयश्री तोडकरी यांना प्रदेश कार्यकारणी सदस्य, मंगलाताई धुळेकर यांना प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच जयश्री राठोड यांनाही प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या नांदेड महानगराध्यक्ष श्रद्धा चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती. नूतन महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम आता तळागळापर्यंत नेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी काम करू असे म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करून काम करण्यास प्रारंभ केला. प्रवेशानंतर अवघ्या सहा महिन्यात या महिला पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या थेट प्रदेश प्रदेश कार्यकारिणीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.  त्यांना प्रदेश कार्यकारणीत वेगवेगळ्या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसारच या सर्व नियुक्त्या करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या आणि जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना मात्र आम्ही आता जिल्हास्तरावरच काम करावे का? असा प्रश्न पडला आहे. अवघ्या सहा महिन्यात थेट प्रदेशावर वर्णी लागल्याने निष्ठेने काम करणाऱ्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र आता संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रणिता देवरे चिखलीकर या कार्यरत आहेत त्याचवेळी डॉ. शितल भालके, संध्या राठोड यांनाही प्रदेश कार्यकारणीवर संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या या महिला पदाधिकाऱ्यांना थेट प्रदेश कार्यकारणीवर संधी दिल्यानंतर समाज माध्यमावर भाजपातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी पोस्ट केल्या आहेत. त्याची दखल आता पक्षपातळीवर कितपत घेतली जाईल, याकडेही लक्ष लागले आहे.  विरोधात काम करणाऱ्यांनाही पदाची खिरापत वाटल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेविकेचा रविवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त नगरसेविकेच्या पती तसेच भाजपाचे सक्रिय नेते असलेल्या पदाधिकाऱ्यानेही एक पोस्ट समाज माध्यमावर टाकली आहे. त्यामध्ये सदर नगरसेविकेच्या कार्याचा आढावा घेताना भाजपा तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये त्यांनी निडरपणे काम केले. नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपाच्या विचारसरणीचा अंगीकार केला. ती विचारसरणी सोडली नाही. दोन वेळा महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले. असे असतानाही या महिला नेत्यास जिल्हास्तरापर्यंतच काम करता आले. प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी मिळाली नाही. असेही या या अनुभवी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नमूद केले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापूर्वी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांना थेट प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंतची पदे दिली. त्यांना आजच नियुक्तीपत्र दिले. हाही निव्वळ योगायोगच आहे. त्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्याची पोस्टही आज चर्चेत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!