
नांदेड – दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि ४०० वर्षांची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथे खंडोबा यात्रेस रविवारी पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी हजारो भाविक माळेगावात दाखल झाले असून या यात्रेकरूंच्या आरोग्यासाठी आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. माळेगावात गेल्या चार दिवसापासून शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. योग्य नियोजनामुळे यंदा पाण्याच्या टँकरची संख्या कमी होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेची आरोग्य पथकेही माळेगावात दाखल झाली आहेत. यावर्षी पहिल्यांदाच महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र माळेगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त लाखो भाविक येतात. जवळपास पंधरा ते वीस दिवस यात्रा सुरू असते. यात्रेची तयारी गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्हा परिषदेमार्फत केली जात आहे. लोहा पंचायत समिती तसेच माळेगाव ग्रामपंचायतही यात्रेच्या नियोजनात व्यस्त आहे. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहेत. लिंबोटी धरणातून माळेगावला पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर बंद राहणारी ही पाणीपुरवठा योजना केवळ माळेगाव यात्रा कालावधीत सुरू असते. वर्षभरात ठिकठिकाणी नादुरुस्त झालेली पाईपलाईन यावेळी बदलण्यात आली आहे. लिंबोटी येथे १२० एचपी क्षमतेचे दोन पंपही सुरू करण्यात आले आहेत. गावांमध्ये तसेच यात्रा परिसरात वाढीव जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध केले जाते. येथे १०० एचपी क्षमतेचे दोन विद्युत पंप आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचीही मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच वेळी आलम हे केमिकलही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे यात्रा कालावधीत शुद्ध पाणीपुरवठा निश्चितच होईल, असा विश्वास जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी व्यक्त केला. यात्रा परिसरात असलेले १४ पाण्याचे हौद स्वच्छ करण्यात आले आहेत. या हौदापर्यंत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. जनावरांसाठी या १४ हौदातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे तर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी दहा जलकुंभ यात्रा परिसरात आहेत. त्यामध्ये दोन मोठे जलकुंभही आहेत. माळेगावातही दोन जलकुंभ असून त्यांची क्षमता ८० हजार लिटरची आहे.
यात्रा कालावधीत शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे वीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये उपअभियंत्यांचाही समावेश आहे. माळेगावातील पाणीपुरवठ्याच्या विद्युत पुरवठ्याचा प्रश्नही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सोडवण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचाही कोणताही प्रश्न राहणार नाही, असेही कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी सांगितले.
सहा आरोग्य पथके दुचाकीवरून देणार उपचार..!जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही यात्रा कालावधीसाठी भाविकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची संपूर्ण तयारी केली आहे. यावर्षी पहिल्यांदाच महिला आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. महिला तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिर घेतले जाईल. या शिबिरात महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत काही आजार आढळल्यास महिलांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयात पाठविले जाणार आहे. माळेगावात सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र राहणार आहेत. त्याचवेळी मोबाईल आरोग्य पथकही नेमण्यात आले आहेत. सहा दुचाकीवरून आरोग्य कर्मचारी भाविकांना थेट जागेवर जाऊन उपचार देणार आहेत. यात्रा परिसरात ही दुचाकी कोणत्याही ठिकाणी जाईल. त्याचवेळी माळेगावच्या दिशेने येणाऱ्या पाच रस्त्यावर आरोग्य पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. नऊ रुग्णवाहिकाही उपलब्ध राहणार आहेत. औषधी साठाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली आहे. माळेगाव येथे यात्रेसाठी १२८ आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये डॉक्टर, सिस्टर, नर्स, स्टाफ नर्स आदी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले.