नांदेड – देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात अचानक मोठा राजकीय भूकंप झाला. ग्रामपंचायतीपासून ते जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने म्हणजेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट भाजपामध्ये तडकाफडकी प्रवेश केला. या प्रवेशानंतर चव्हाण यांनी आपली ही राजकीय जीवनाची नवी सुरुवात असल्याचे स्पष्ट केले. मात्र चव्हाण यांच्या निर्णयानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणात प्रचंड उलथापालथ होणार असून जिल्ह्यातील राजकारणातही ही नवी पहाट ठरणार आहे.
राज्याच्या राजकारणात ‘हेडमास्तर’ आणि देशाच्या राजकारणात एस. बी. चव्हाण म्हणून परिचीत असलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या छत्रछायेत राजकीय वाटचाल सुरू केलेल्या अशोकराव चव्हाण यांनी १९८७ मध्ये खासदारकीच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या चव्हाण यांना काँग्रेसने दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री पदही भूषविण्याची संधी दिली. या काळात नांदेड जिल्हा विकासाच्या प्रगतीपथावर धावू लागला होता. मात्र काँग्रेसमधीलच गटबाजीतून चव्हाण यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. तेव्हापासूनच काँग्रेसमधील वरिष्ठांनी चव्हाण यांच्यापासून काहीसे अंतरच राखले होते. हे अंतर काहीसे किंबहुना पूर्णतः कमी झाल्याचे चित्र ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान निर्माण झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पहिल्या टप्प्यातील ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रातील आगमन हे नांदेड जिल्ह्यातून झाले होते. या यात्रेच्या स्वागतात कोणतीही कमतरता चव्हाण यांनी ठेवली नव्हती. या यात्रेनंतर देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसला तेलंगणा वगळता इतर राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पाच राज्यातील निवडणुका या लोकसभेची सेमी फायनल म्हणूनही बघितल्या जात होत्या. त्यामध्ये काँग्रेसचे झालेले ‘पानिपत’ आगामी काळातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी होती. इकडे नांदेड जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथील बडा नेता भाजपात लवकरच दाखल होईल, अशी भविष्यवाणी आपल्या नांदेड दौऱ्यात केली होती. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोकराव चव्हाण यांचे नाव घेत ते लवकरच भारतीय जनता पक्षात दाखल होतील असा दावा केला. या दाव्याचा काँग्रेसकडून वारंवार इन्कार केला जात होता. नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला महिला मेळावा तर आगामी लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा म्हणूनच गणला गेला होता. मात्र अचानक राजकीय चक्र फिरली आणि १३ फेब्रुवारी रोजी अशोकराव चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला, राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि ते बिनविरोध खासदारही झाले.
नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांचे पक्षात स्वागत करावे लागणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाचा निर्णय योग्यच असतो असे सांगताना आगामी काळात आपण या विषयावर बोलू असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची भूमिका ही नेमकी काय राहील यावरही जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
या सर्व घटनाक्रमानंतर 23 फेब्रुवारी रोजी अशोकराव चव्हाण यांचे नांदेडमध्ये भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार म्हणून पहिल्यांदाच आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून मात्र आगामी लोकसभेत निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा दावा केला जात आहे. काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांनी नांदेडमध्ये दोन दौरे करून परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात काँग्रेसच्या नव्या शहराध्यक्षांची ही निवड करण्यात आली आहे. आज घडीला काँग्रेसमध्ये असल्याचा दावा करणाऱ्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांबाबत काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच शंका घेतली जात आहे. हे नेते, पदाधिकारी काँग्रेसमध्ये राहतील की नाही याबाबतही उघडपणे चर्चा केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील कोणकोणते नेते, पदाधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षातील प्रमुख पदाधिकारीही अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे आनंदित झाले आहेत. ‘वसंतनगर’पासून सुटकारा पाहिजे असलेल्या भाजप नेत्यांना आता ‘शिवाजीनगर’चा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. अशोकराव चव्हाण यांच्या नांदेडमधील प्रवेशानिमित्त शहरात लावलेल्या बॅनरवरूनच गटबाजी स्पष्ट होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारणात आगामी काळात कोणकोणते राजकीय स्थित्यंतर होतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.