
नांदेड – लोकसभा निवडणुकीअंतर्गत लातूर मतदारसंघासाठी लोहा विधानसभा मतदारसंघात ७ मे रोजी ३३० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदान कर्मचारी सोमवारी सकाळीच आपापल्या केंद्रावर रवाना झाले असून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये लोहा आणि कंधार तालुक्यातील गावे समाविष्ट आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख ९२ हजार ५९९ मतदार आहेत. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या १ लाख ४१ हजार २७३ आणि पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५१ हजार २३० इतकी आहे. सहा तृतीयपंथी मतदार लोहा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. ज्येष्ठ मतदारांची संख्या ४ हजार ६४२ इतकी असून त्यामध्ये १ हजार ७४५ पुरुष मतदार तर २ हजार ८९७ महिला मतदार आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. ७ मे रोजी वादळी वारे तसेच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा हवामानाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी पहिल्या टप्प्यातच मतदान करावे असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोहा विधानसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी १ हजार ७५९ हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी ७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागाने १२ भरारी पथके स्थापन केली होती. तसेच १० एसएसटी टीमही कार्यरत होत्या. व्हिडिओ सर्विलंस टीमची संख्या बारा होती. तर व्हीव्हीटीचे आठ पथक या मतदारसंघात अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कार्यरत होते.
लोहा विधानसभा मतदारसंघात ३३० एकूण मतदान केंद्र आहेत. त्यातील तीन मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. महिला संचलित मतदान केंद्राची संख्या एक असून युवा कर्मचारी संचलित एक मतदान केंद्र एक राहणार आहे. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून एक मतदान केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर लोहा तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील पंचायत समिती सभागृहात ईव्हीएम मशीन ठेवल्या जातील. त्यानंतर सदर ईव्हीएम मशीन लातूर येथील मुख्यालयात पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली.
जिल्हाधिकारी राऊत यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत प्रवास… लोहा विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान कर्मचारी सोमवारी सकाळी आपापल्या केंद्रावर निवडणूक साहित्यासह लोहा येथून रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना दिल्या, शुभेच्छा दिल्या. मतदान कर्मचारी आपल्या केंद्रावर रवाना होत असताना त्यांच्या बसमध्ये जिल्हाधिकारी पोहोचले. त्यांच्यासोबत काही अंतर प्रवासही करून या कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली. यावेळी कंधार उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांचीही उपस्थिती होती.