
नांदेड – जिल्ह्यात १५ ते २० दिवसाच्या खंडानंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ३९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंदही झाली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना आता गती मिळणार आहे त्याच वेळी यापूर्वी पेरणी केलेली पीक सुकू लागली होती. त्या पिकांनाही आता जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यातील १० महसूल मंडळात एकाच दिवशी १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस नोंदवला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पावसाला प्रारंभ झाला. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चांगलाच बरसत होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १२२ मिलिमीटर पाऊस माहूर तालुक्यात झाला आहे. किनवट तालुक्यात १०४.७० आणि हिमायतनगर तालुक्यात १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांदेड तालुक्यात ७५.६०, बिलोली ७०.३०, मुखेड २४.८०, कंधार ३४.५०, लोहा ४२.४०, भोकर ५४.२०, देगलूर ३७.७०, किनवट १०४.७०, मुदखेड ६२.९०, हिमायतनगर १०१, माहूर १२२.३०, धर्माबाद २५.१०, उमरी ३७.८०, अर्धापूर ५९.५० आणि नायगाव तालुक्यात ३९.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पावसाच्या १५.३१ टक्के पाऊस झाला आहे.
माहूर महसूल मंडळात एकाच दिवशी १५६ मिलिमीटर पाऊस..! जिल्ह्यात ३९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे त्यामध्ये माहूर महसूल मंडळात एकाच दिवशी सर्वाधिक १५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. किनवट तालुक्यातील मांडवा महसूल मंडळात ११९.७५, किनवट तालुक्यातील दहेली मंडळात १४७.७५, सिंदगी १४१, उमरी बाजार १२५, हिमायतनगर १०१, जवळगाव १०१, सरसम १०१, वानोळा १४१ आणि सिंदखेड महसूल मंडळात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद एकाच दिवशी झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळामध्ये नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, लिंबगाव, वाजेगाव आणि नाळेश्वर महसूल मंडळाचा समावेश आहे. बिलोली तालुक्यातील बिलोली, कुंडलवाडी, लोहगाव, रामतीर्थ, लोहा तालुक्यातील कापसी, हदगाव तालुक्यातील तळणी, निवघा, मनाठा, तामसा, पिंपरखेड, भोकर तालुक्यातील मोघाळी, मातुळ, किनवट तालुक्यातील किनवट, बोधडी, इस्लापूर, जलधारा, शिवणी, मांडवा, दहेली, सिंदगी, उमरी बाजार, मुदखेड तालुक्यातील मुगट, हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव, सरसम, माहूर तालुक्यातील माहूर, वानोळा, वाई, सिंदखेड, अर्धापूर तालुक्यातील दाभड आणि नायगाव तालुक्यातील नरसी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.