
मुंबई : नांदेड शहर व परिसराचा पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईत दिले. नांदेड शहराच्या सुनियोजीत विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली.
मुंबईत बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे नांदेड शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, खा. प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते. नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी खासदार चव्हाण, डॉ. गोपछडे, चव्हाण, आमदार पाटील, कल्याणकर, बोंढारकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, बालाजी पाटील खतगावकर यांनी नांदेड शहर व परिसर विकासाच्या दृष्टीने मनोगत व्यक्त केले.
नांदेड शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असून पवित्र नगरी म्हणून या शहराचा सुनियोजित विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी देश आणि जगभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे चांगले रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, बाग बगीचे शहरात व्हावे याकरीता पुढील २५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन शहराचा विकास आराखडा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एमएमआरडीने त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधितांची एक बैठक घेऊन शहराचा सुनियोजीत विकास कसा करता येईल याबाबत चर्चा करावी. आवश्यकता भासल्यास शहराच्या विकास आराखडा कसा असावा, पवित्र नगरी म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास करता येईल यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत नांदेड शहर महापालिकेची हद्दवाढ व प्राधिकरणाच्या विषयी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला.