
नांदेड – नवीन नांदेडातील बळीरामपूर येथे एका घराला लागलेल्या आगीत रोख ५० हजारांसह ३ तोळे सोने, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.
नवीन नांदेडातील बळीरामपूर पांडुरंगनगर येथील उज्वला अंबाजी वाघमारे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत संसारोपयोगी वस्तू , रोख पन्नास हजार रुपये, तीन तोळे सोने जळून खाक झाले. सदरील आगीमध्ये अंदाजे चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले.
ही आग अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे व उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विझविण्यात आली. फायरमन उमेश ताटे, विनय मोरे, नरवाडे यांच्यासह नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि कर्मचाऱ्यांनी विझविण्यासाठी परिश्रम घेतले.