
नांदेड – नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित व लोकप्रिय कार्यक्रम संगीत शंकर दरबारचे २५ फेब्रुवारी रोजी सायं. ५.३० वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्घाटन होणार आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व जागतिक कीर्तीचे सतार वादक पद्मभूषण पं. बुधादित्य मुखर्जी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण व सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी संगीत शंकर दरबार या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे २१ वे वर्ष आहे. यापूर्वी देशभरातील अनेक नामवंत गायक व वादक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावर्षी २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस हा सोहळा रंगणार आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व जागतिक कीर्तीचे सतार वादक पद्मभूषण पं. बुधादित्य मुखर्जी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होईल. यावेळी माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
यंदाच्या संगीत शंकर दरबार सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका श्रीमती अनुराधा नांदेडकर (हिंगोली) यांच्या यांचा जीवनगौरव पुरस्काराने सत्कार होणार असून, त्यानंतर साधना सरगम यांच्या सुरांची मैफिल रंगणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर व कोषाध्यक्ष ॲड. उदय निंबाळकर यांनी केले आहे.