
नांदेड- मार्चमध्येच उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यात या वाढत्या उष्णतेचा विचार करून व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली. हा निर्णय ६ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा परिषदेने शाळांच्या वेळेच्या बदलाबाबतचा निर्णय ६ मार्च रोजी लागू करण्यात आला असला तरी याबाबतची अधिकृत माहिती मात्र ७ मार्च रोजी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचा कार्यक्षम कारभार पुढे आला आहे.
आरटीई अधिनियम २००९ नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण तासांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच शिक्षकांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून अध्यापनाचे नियोजन करावे. नव्या आदेशानुसार शाळा सकाळी ८:३० वाजता सुरू होईल व दुपारी १ वाजेपर्यंत चालणार आहे. शाळांमध्ये तीस मिनिटांची मध्यांतर राहणार आहे. दोन सत्र पद्धतीने चालणाऱ्या शाळांनीही यासंदर्भात ठरवलेले वेळापत्रक पाळावे लागेल आहे. गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यातील शाळांचे वेळापत्रक निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच त्यांनी वेळोवेळी शाळांना भेट देऊन नियमानुसार शाळा सुरळीत सुरू आहेत की नाहीत, याची खात्री करावी.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विद्यार्थ्यांना संरक्षण मिळावे व त्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी शाळा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिले आहेत.
सध्या मार्च महिना सुरु असून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आरोग्यविषयक समस्या उदभवू नये व विद्यार्थांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी मान्यता दिल्यानुसार ६ मार्चपासून हा बदल करण्यात आला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी एक वाजेपर्यंत राहील. शाळांची मधली सुट्टी तीस मिनिटांची असेल. दुबार पध्दतीने भरणाऱ्या शाळांनी वेळ निश्चित करुन कार्यालयीन तास पुर्ण करण्याच्या अनुषंगाने मुख्याध्यापक यांनी नियोजन करुन गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात यावेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.