
नांदेड :- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असल्याचे स्पष्ट होत आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी वजिराबाद परिसरातील महावीर चौक ते मुथा चौक वजिराबाद रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढले. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने १७ अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल तीन ट्रॅक्टर माल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील बहुतांश रस्त्यावर व्यापाऱ्यांनी तसेच किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. गुरुद्वारा परिसरातील रस्ता मोकळ्या केल्यानंतर महापालिकेने आता मंगळवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महावीर चौक ते मुथा चौकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
या मोहिमेनंतर वजीराबाद रस्ता मोकळा झाला होता. अशीच कारवाई आता महापालिकेने जुना मोंढा ते महावीर चौकापर्यंत करावी अशी मागणी पुढे आली आहे. या रस्त्यावर तारासिंग मार्केट परिसरात केवळ पाच ते दहा फुटाचा रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहत आहे. एकतर्फी वाहतूक असतानाही या मार्गावरून दुहेरी वाहतूक होत असते. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. त्याचवेळी तारासिंग मार्केट परिसरात सामानाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांचा कायमचा थांबाच या मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळेही वाहतुकीला वारंवार अडथळा होतो. यावरही आता महापालिकेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाईची मोहिम सुरुच राहील, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पार पाडली. गुरुव्दारा मुख्य रस्त्यावरील रहदारीस व पदचाऱ्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, वाहतुक पोलीस निरीक्षक गुट्टे, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, अनिल चौदंते व पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.