
नांदेड – जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर जवळील तंगधार येथे जात असताना सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात वीरमरण आलेल्या देगलूर तालुक्यातील तमलूर येथील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे ( वय २९) यांच्यावर आज शुक्रवारी देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सचिन वनंजे यांना ८ महिन्याची एक मुलगी आहे. त्यांचे लग्न २०२२ मध्ये झाले होते.
शहीद सचिन वनंजे यांच्या वाहनाला ६ मे रोजी अपघात झाला होता. ८ हजार फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचे हे वाहन कोसळले होते. कुपवाडमध्ये पाकिस्तान सीमेलगत बालाकोट तंगधार ही पोस्ट आहे. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. आज देगलूर येथे झालेल्या अंत्यसंस्कार समयी देगलूर तसेच जिल्हाभरातील देशप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते. भारत माता की जय या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आ. जितेश अंतापूरकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आदींची उपस्थिती होती.
शहीद जवान सचिन वनंजे देगलूर तालुक्यातील तमलूर या गावचे मुळ रहिवाशी होते. सचिन यादवराव वनंजे यांचे वय अवघे २९ वर्ष होते. ते २०१७ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांची पहिली नियुक्ती ही सियाचीन भागात झाली होती. त्यानंतर पंजाबमधील जालंदरमध्ये ते देशसेवेसाठी तैनात होते. पंजाबनंतर गेल्या दीड वर्षांपासून ते श्रीनगरमध्ये सेवेत होते. ६ मे रोजी त्यांची पोस्टींग इतर ठिकाणी झाली होती. याच चौकीकडे सैन्य दलाचे वाहन त्यांना घेऊन जात होते. त्यावेळी ८ हजार फूट खोल दरीत त्यांचे वाहन कोसळले. या दुर्घटनेत ते शहीद झाले.
कश्मीर येथे शहीद जवान नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याचे भूमिपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशाची रक्षा करताना वीरगती प्राप्त झाली. या शाहिदास नमन करून गुरुवारी रात्री नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने आणि गोवर्धन घाट दिलीपसिंग कॉलनी, टेकडी या परिसरातील नागरिकांनी शहीद सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहिली. भारत माता की जय, अमर रहे अमर रहे, सचिन वंनजे अमर रहे, असेही नारे देऊन शहीद सचिन वनंजे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे बालाजी चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे दीपकसिंघ महाराजिया, गगन यादव, संजय शर्मा, दिपक खरात, धनजय उमरीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, स्थानिक महिलाही उपस्थित होत्या.