
नांदेड – शहरातील ऐरणीवर आलेल्या वाहतूक व्यवस्था आणि विजेचा लपंडाव या दोन प्रमुख समस्यांपैकी असलेल्या महावितरणच्या विजेच्या लपंडावाचा कारभाराबद्दल आता महावितरणने अचानक वाढलेल्या तापमानावर खापर फोडले आहे. थकीत वीज बिल वसुलीचे कामही दरम्यानच्या काळात महावितरणने प्राधान्याने केले. त्यामुळे शहरात विजेच्या उद्भवणाऱ्या समस्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शहरात विजेच्या प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले. मात्र आता शहरातील विजेची ओव्हरलोडींग कमी करण्यासाठी महावितरणने पाच नवीन सबस्टेशन आणि १७ वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात जागाही निश्चित झाल्या आहेत. हे काम येत्या चार ते पाच महिन्यात पूर्ण होईल, असे महावितरणचे नांदेड अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी स्पष्ट केले.
नांदेड शहरात गेल्या पंधरा दिवसापासून विजेची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. विजेच्या या लपंडावाला नागरिक वैतागले आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या नीट आणि आता आगामी काळात होणाऱ्या जेईई या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या महावितरणच्या गलथान कारभाराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून जेईई तसेच नीटची तयारी करण्यासाठी विद्यार्थी नांदेडमध्ये येत असतात. मात्र नांदेडमध्ये सुरू असलेल्या महावितरणच्या या कारभारामुळे नांदेडची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच महावितरणच्या या संपूर्ण कारभाराचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० मे रोजी महावितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता महावितरणकडून नेमके काय काय खुलासे केले जातात, याकडेही आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठ दिवसात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विद्युत खांबावरील तारांचे नुकसान झाले आहे. त्यात शहरी भागात अनेक ठिकाणी विनापरवानगी लावलेले बॅनर या तारावर पडून विजेचा प्रश्न आणखीच गंभीर झाला आहे.
महावितरणच्या या कारभाराबाबत सर्वत्र ओरड सुरू आहे याबाबत महावितरणचे नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्याशी ‘नांदेड स्क्रिप्ट’ ने बातचीत केली असता जाधव एप्रिलमध्ये अचानक वाढलेले तापमान विजेच्या लपंडावासाठी कारणीभूत ठरवले आहे. अचानक तापमान वाढल्याने विजेचा लोड वाढला. पाचशे पर्यंतचा लोड दोन हजारपर्यंत गेला त्यामुळे अतिभारीत प्रमाणामुळे अनेक ठिकाणी विजेचे प्रश्न निर्माण झाले. त्याचवेळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी वीज बिल वसुलीच्या कामातही गुंतले होते. त्यामुळे या प्रश्नाकडे काही काळ दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी मान्य केले.
हा प्रश्न गंभीर होताच महावितरणकडून ओव्हर लोडिंग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात फिडर ॲडजस्टमेंट केली जात आहे. त्याचवेळी विद्युत रोहित्राना थंड ठेवण्यासाठी कुलरचाही वापर केला; मात्र तापमानात दिवसेंदिवस वाढ होत गेल्याने समस्या कमी झाली नाही. ही समस्या आता कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महावितरणने आता पावले उचलली असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. येत्या चार ते पाच महिन्यात शहरांमध्ये पाच नवीन सब स्टेशनची भर पडणार आहे.
शहरात सध्या १४ वीज सबस्टेशन आहेत. त्याचवळी १७ ट्रान्सफरचेही नियोजन करण्यात आले आहे नवीन पाच सबस्टेशनसाठी पाच जागाही निवडण्यात आल्या आहेत. या जागा उपलब्ध होतात तातडीने सब स्टेशनचे काम सुरू होईल. यासाठी निविदा काढल्या असून वर्क ऑर्डरही देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. येत्या तीन ते चार महिन्यात शहरातील ओव्हरलोडींगचा हा प्रश्न मार्गी लागेल, असेही ते म्हणाले. सध्या वाढत्या तापमानामुळे ओव्हरलोडींग होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी विजेचा अतिरिक्त वापर थांबवावा. आवश्यक असेल त्याच विजेच्या उपकरणांचा वापर करावा ज्यातून ओव्हरलोडींगचा प्रश्न काही अंशी का होईना सुटेल, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.



