
नांदेड – शहरातील हिंगोली गेट भागात असलेल्या पांपटवार सुपर मार्केटला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून तब्बल सात तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली आहे. आग विझवण्यासाठी २२ अग्निशमन बंबाचा वापर करण्यात आला. या सुपर मार्केटमध्ये असलेले ११ गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी या भीषण आगीतून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सोमवारी एकाच आगीची ही चौथी घटना ठरली.
शहरातील हिंगोली गेट भागात पांपटवार सुपर मार्केट आहे. किराणा, भुसार मालासह खाद्यतेलाचाही मोठा साठा या सुपर मार्केटमध्ये होता. रात्री दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्री अचानक या दुकानाला आग लागली. ही बाब अग्निशमन दलाला कळविण्यात आली. तातडीने अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्यासह उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांच्यासह १५ कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. एकापाठोपाठ एक अग्निशमन बंब आणण्यात येत होते; मात्र आगीचा भडका वाढतच होता. दुकानातील तेल खाद्यतेल साठ्याला आग लागली. त्यातच एसी कॉम्प्रेसर फुटल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. त्यात दुकानात एक नाही दोन नाही तर तब्बल ११ गॅस सिलेंडर असल्याची बाबही पुढे आली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने हे गॅस सिलेंडर बाहेर काढले. त्यातून पुढील अनर्थ टळला. तब्बल सात तासांच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. ही आग विझविण्यासाठी २२ अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला. ही आग लागल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. त्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुकानात ठेवण्यात आलेले मोठमोठे तेलाचे ड्रम तसेच मिळेल तिथे साहित्याचा साठा करण्यात आला होता. त्यामुळे दुकानामध्ये जाऊन आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सोमवारी मध्यरात्री लागलेली ही आग मंगळवारी सकाळी सात वाजता साधारणपणे आटोक्यात आली आहे. अजूनही अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहे. या आगीत जवळपास सहा कोटीहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गॅस सिलिंडरचा साठा कशासाठी..? पांपटवार यांचे तळमजल्यावर सुपर मार्केट होते. कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. तर दुसऱ्या मजल्यावर टिनशेड टाकण्यात आले होते. टिनशेडमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. दुकानात मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध होते. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले होते. त्यात कुटुंबातील काही सदस्य घरात असल्याने काही काळ काळजाचा ठोका चुकला होता. सुदैवाने सर्वांना वेळीच बाहेर काढण्यात आले. जवळपास सहा जण घरात होते तर काही सदस्य बाहेरगावी गेले होते. या आगीदरम्यान बाहेर काढण्यात आलेले ११ सिलेंडरही चर्चेचा विषय ठरले आहेत. एकाच घरात गॅस सिलेंडरचा इतका साठा कशासाठी करण्यात आला होता याबाबतही आता शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.