
नांदेड – किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रात मदनापुर येथे एका वाघाचा मृत्यू झाल्याची बाब शनिवारी सकाळी उघडकीस झाली होती या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या वाघाची हत्या केली होती का असा प्रश्नही पुढे आला होता; मात्र वन विभागाने या घटने प्रकरणी स्पष्ट करताना सदर वाघाचा मृत्यू हा रेल्वेच्या धडकेने झाल्याचे सांगितले. मृत वाघ हा मादी प्रकारातील होता.वाघाचे सर्व अवयव कायम असल्याने हा अपघातच असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
शनिवारी सकाळी बोधडी वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ बोधडी नियतक्षेत्र दरसांगवी येथील रेल्वे स्टेशन किनवट ते नांदेड जाणा-या रेल्वे लाईनवर सोमेश्वर महादेव मंदीर मदनापुरजवळ रेल्वेच्या धडकेने मादी वाघाचा मृत्यू झाल्याची घटना निदर्शनात आली आहे. सदर माहिती मिळताच घटना स्थळावर जिल्हा उप वनसंरक्षक मनिषा पाटील, सहायक वनसंरक्षक एस.डी. इटलोड (रोहयो व वन्यजीव), किनवटचे सहायक वनसंरक्षक (जकास किरण चव्हाण व कॅम्पा), बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) श्री. सी.जी. पोतुलवार, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) धिरज मदने, एनटीसीएचे प्रतिनिधी अतिद्र कटी तसेच पार्डी पशु चिकित्सालय डॉ. राहुल मोतीराम जोंधळे यांनी घटनास्थळी मृत वाघ (मादी) पाहणी करून पंचनामा नोंदविण्यात आला. सदर घटना ही रेल्वे धडकेत वन्यप्राणी वाघ (मादी) मृत पावल्याचे निष्पन झाले. त्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे आहे. अपघातात ठार झालेल्या वाघाचे सर्व अवयव असल्याचे दिसून आले आहेत.
सदर मृत वाघ (मादी) चे श्ववविच्छेदन करण्यासाठी सावरी वन आगार येथे जिल्हा उपवनसंरक्षक मनिषा पाटील, सहायक वनसंरक्षक एस.डी. इटलोड (रोहयो व वन्यजीव), एनटीसीएचे प्रतिनिधी अतिद्र कटी यांच्या समक्ष किनवटचे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. संजीव विठलराव पाटील, पार्डी पशु चिकित्सालय डॉ. राहुल मोतीराम जोंधळे, माळबोरगाव येथील पशु चिकित्सालयाचे डॉ. योगेश शामराव पाटील, जलधारा चिकित्सालयाचे डॉ. निरंजन दतात्रय बागल, मांडवी पशु चिकित्सालयाचे डॉ. सुनिल आनंदराव जाधव यांनी श्ववविच्छेदन केले. उत्तरीय तपासणीसाठी विसेराचे नमुने काढून शवविच्छेदनानंतर उपस्थित सर्व पंचासमक्ष मृत वाघाचे (मादी) सावरी आगार येथे दहन करण्यात आले. सदर कार्यवाहीच्या वेळी किनवटचे सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण, बोधडी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. सी.जी. पोतुलवार, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज मदने, खरबीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव टी. एन. साळुंके, रेल्वे पोलीस किनवट सहायक उपनिरिक्षक भगवान नागरे यांच्यासह इतर वन कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड – यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यातून ही वाघीण किनवटच्या जंगलात आली असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या १५ दिवसांत परिसरातील अनेक गावातील जनावरांची शिकार तिने केली होती. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या सर्व प्रकारामुळे वाघिणीच्या हत्येचा संशय घेतला जात होता. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट करताना हा अपघातच असल्याचे सांगितले आहे.



