नांदेड जिल्हा

कृष्णूर एमआयडीसीमध्ये बिबट्याचा थरार..। एका कामगारासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरही हल्ला..! 

वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी लावला पिंजरा, ट्रॅप कॅमेरे, कृष्णूरसह परिसरातील घुंगराळा, बरबडा, कुंटूर, कुंटूर तांडा, कहाळा आदी गावांमध्येही सतर्कता बाळगण्याचे आवाहन

नांदेड – लोहा तालुक्यातील रत्नेश्वरी मंदिर परिसरात बिबट्या आढळल्यानंतर वीस दिवसातच पुन्हा एकदा बिबट्याने कृष्णूर एमआयडीसीमध्ये आपले दर्शन घडवले आहे. इतकेच नव्हे तर या बिबट्याने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सिट्रस कंपनीच्या एका कामगारावर हल्लाही चढवला आहे. त्यानंतर या बिबट्याच्या शोधात निघालेल्या वनविभागाच्या कामगारावरही हल्ला चढवल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. एकूणच बिबट्यांच्या भीतीने आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगल परिसरात आढळणारा बिबट्या आता जिल्ह्यातील विविध भागात आढळत असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी केले आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी वसाहतीत असलेल्या सिट्रस कंपनीच्या श्रीकांत पप्पुलवाड नामक कामगारावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात त्याने कसेबसे प्राण वाचवले; मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभागासह पोलिसांनाही दिली. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कृष्णूर एमआयडीसी परिसरात दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला.  त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, पिंजरेही लावण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार या बिबट्याच्या शोधात असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरही सदर बिबट्याकडून हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या काळात काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. कृष्णूरसह परिसरातील घुंगराळा, बरबडा, कुंटूर, कुंटूर तांडा, कहाळा आदी गावांमध्येही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

नागरिकांनी, शेतकऱ्यांनी स्वतःसह जनावरांचे जीव वाचवण्यासाठीही खबरदारी घ्यावी, एकट्याने शेतात न जाता एकत्रितपणे शेतात जावे, शेतातील जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावेत, शेतातील रात्रीची कामे टाळावीत. त्याचवेळी बिबट्या हा आपल्यापेक्षा कमी उंचीच्या प्राणी अथवा जीवावर हल्ला करत असतो. त्यामुळे बिबट्या दिसल्यास वाकून न चालता त्याच्यापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी केले आहे. कृष्णूर भागातील परिस्थिती पाहता हा बिबट्या या भागात चार ते पाच दिवसापेक्षा अधिक काळ वास्तव्यास राहणार नाही अशी शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!