नांदेड जिल्हा

कर्जमाफीच्या तीन याद्या घोषित; माझं नाव एकाही यादी नाही..! मरण्यापूर्वी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली चौकशीची मागणी

नांदेडमध्ये बोरगाव येथील शेतकऱ्याने माझी कर्जमाफी का नाही झाली म्हणत गळफास घेऊन केली आत्महत्या, शासन प्रशासनाच्या धोरणावर मरणापूर्वी केलेल्या व्हिडिओतून उपस्थित केले सवाल

नांदेड – शेतकरी कर्जमाफीच्या तीन याद्या घोषित..! एकाही यादीत माझं नाही… कलेक्टर साहेब माझी चौकशी करा.. असे म्हणत एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदेड तालुक्यातील बोरगाव येथे सोमवारी दुपारी घडली. याच व्हिडिओत शेतकरी शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) यांनी शासन मुलींना शैक्षणिक शुल्क माफ आहे, असे सांगते मात्र प्रत्यक्षात मुलींकडून शासन शिक्षणासाठी फीस वसूल करत असते हे वास्तवही मांडले आहे. या शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात प्रशासनाकडे चौकशीसाठी संपर्क साधला असता एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. हा सुद्धा नांदेड जिल्हा प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचा एक नमुनाच आहे.

पावसाच्या दीर्घ खंडामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी आणि त्यातच कर्ज व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा डोंगर… या दुष्टचक्रात सापडलेल्या नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) यांनी अखेर हतबल होऊन मृत्यूला कवटाळले. सोमवारी शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ अपलोड करत शासन-प्रशासनाच्या धोरणांवर अत्यंत तिखट शब्दांत संताप व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीबद्दल राज्यकर्ते आपल्या टीरी बडवून घेत आहेत. आतापर्यंत तीन शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या पण त्यात माझे नाव कुठेही आले नाही, अशी खंत शेतकरी शंकर क्षीरसागर यांनी स्वतः बनवलेल्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे. स्वतःवर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी अत्यंत पोटतिडकीने अश्रू ढाळत आपली व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांनी आपली चौकशी करावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मी शेतकरी म्हणून आत्महत्या करीत असल्याचेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. यातून शेतकऱ्यांच्या अगतिकतेची जाणीव होत आहे.

क्षीरसागर यांना दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शासनाकडून मुलींचे शिक्षण मोफत झाल्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष अर्जांनंतरही क्षीरसागर यांच्या मुलीची फी माफ झाली नव्हती. मयत शंकर क्षीरसागर यांच्याकडे अल्पशी शेती होती. त्यांनी सोयाबीनचे पीक घेतले होते; परंतु यंदा पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे पीक पूर्णपणे वाया गेले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतीतील नुकसान आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीचा ताण यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. याच चिंतेतून त्यांनी आपला जीवन प्रवास गळफास घेऊन संपविला मात्र त्यांनी केलेल्या व्हिडिओमुळे शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास क्षीरसागर शेतात गेले. तेथे त्यांनी मोबाईलवर स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओ पाहताच नातेवाईक आणि पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्यांनी शेतात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती. रंगाचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा झाल्याचे सांगितले आहे. पुढील प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!