
नांदेड – राज्यभरात बिबट्यांची दहशत निर्माण झालेली असताना लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारातही एक बिबट्या आढळला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी भयभयीत झाले आहेत. या भागातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या पाहणीत ३१ बिबटे आढळले आहेत. दरम्यान, वडेपुरी शिवारात आढळलेल्या बिबट्याची खातरजमा करण्यासाठी वन विभागाचे एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. या पथकाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतरच बिबट्याचे वास्तव्य स्पष्ट होईल, अशी माहिती नांदेड जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी केशव वाबळे यांनी दिली.
जिल्ह्यात असलेल्या अनेक वनपरिक्षेत्रात बिबट्यांचे वास्तव्य आढळले आहे. लोहा तालुक्यातही बिबट्याचे वडेपुरी परिसरात दर्शन झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या भागात पाण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याने आता रब्बीची पेरणी तसेच शेतीची इतर कामे केली जात आहेत. त्यामुळे या काळात बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतकरी भयभयीत झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात १२ मे ते १३ मे २०२५ दरम्यान करण्यात आलेल्या पाहणीमध्ये जिल्ह्यात असलेल्या एकूण १२ वनपरिक्षेत्रापैकी नऊ वनपरिक्षेत्रात बिबट्याचे वास्तव्य आढळले होते. त्यामध्ये सर्वाधिक आठ बिबटे हे माहूर वनपरिक्षेत्रात आढळले होते. किनवट वनपरिक्षेत्रात दोन, बोधडी ४, अप्पारावपेठ ३, इस्लापूर २, हिमायतनगर २, हदगाव १, भोकर ४ आणि नांदेड वनपरिक्षेत्रातही पाच बिबटे आढळले होते.
रविवारी सायंकाळी अतुल सेन नामक व्यापाऱ्याने रत्नेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलनजीक त्यांच्या मोबाईलमधून दोन व्हिडिओ काढले आहेत. सदर व्हिडिओमधील बिबट्या हा वडेपुरी शिवारातील माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी पर्ण हॉटेलजवळ दिसून आला आहे. याबाबत वनविभाग तसेच आसपासच्या सर्व गावातील पोलीस पाटील यांना सूचना देऊन सर्व गावांमध्ये दवंडी देण्यात आली असल्याची माहिती सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी दिली.



