
नांदेड – नांदेड जिल्ह्याला आगामी खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खतांची उपलब्धता असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी सरासरी २ लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता असते. आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे २ लाख ११ हजार ५०० मे.टन इतके खत आवंटन प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ६० हजार २०० मे. टन युरिया, ३२ हजार ३०० मे. टन डीएपी व ८५ हजार ३०० मे. टन संयुक्त खते यांचा समावेश आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत ६७ हजार मे. टन संयुक्त खतासहित एकूण १ लाख २५ हजार ५९९ मे. टन खते बाजारात उपलब्ध आहेत.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने खत ही सर्वात महत्त्वाची निविष्ठा असते. राज्य पातळीवर खताचे नियोजन कृषी आयुक्तालय पुणे येथून होत असते. मागील वर्षीची शिल्लक व यावर्षी १ एप्रिलपासून आजतागायत झालेला पुरवठा याचा अभ्यास केल्यास बाजारात ३१ हजार ९८ मे. टन युरिया होता. पैकी १ एप्रिलपासून आजअखेर १४ हजार ५९७ मे. टन युरियाची विक्री झाली आहे. १६ हजार ५०२ मे. टन युरिया मार्केटमध्ये उपलब्ध आहे. १९ हजार २७५ मे. टन डीएपी पैकी ७ हजार ६०० मे. टन विक्री झाली आहे. आज बाजारात ११ हजार ६७४ मे. टन डीएपी खत उपलब्ध आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे डीएपीसारखे खत आवश्यकतेपेक्षा थोडे कमी उपलब्ध असले तरीही 20:20:0:13, 12:32:16 यासारखे संयुक्त खतांचे पर्याय शेतकऱ्यांना वापरता येतील. सद्यस्थितीत ६७ हजार मे. टन संयुक्त खतासहित एकूण १ लाख २५ हजार ५९९ मे. टन खते बाजारात उपलब्ध आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसेच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये. खते उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण झाल्यास, वाजवीपेक्षा जास्त दरात खत विक्री होत असल्यास, खतामध्ये कोणत्याही प्रकारची लिंकिंग होत असल्यास अथवा बोगस खतांची विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
साडेपाच हजार मेट्रिक टनाचा स्टॉक..! टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने ‘बफर स्टॉक’ म्हणजेच संरक्षित खतसाठा निर्माण केलेला आहे. आज रोजी यामध्ये ४ हजार २८ मे. टन युरिया व १ हजार ४८५ मे. टन डीएपी खत उपलब्ध आहे, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे.



