
नांदेड :- केवळ एक रुपयामध्ये शेतातील पिकाचा विमा काढला जातो. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करते. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यासंदर्भात कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले, गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी घेतला आहे. यावर्षी ९७ टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. पिके संरक्षित करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील ११ लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. मात्र यावर्षी ११ जुलैपर्यंत ७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये ४०० कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेता प्रत्येक गावागावात यासंदर्भात जनजागृती व्हावी. केवळ १ रुपयामध्ये सेवाकेंद्र, सेतूकेंद्र व बँकेत जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो.
शेवटच्या तारखेची वाट बघू नका… पीक विमा योजनेसाठी १५ जुलै शेवटची मुदत आहे. परंतू शेवटच्या तारखेला पीक विमा भरतांना पोर्टलवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यापूर्वीच योजनेत आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये वेळेला महत्त्व असते. त्यामुळे मुदतवाढ दिली जाणार नाही, हे लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.