
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी वरदान असलेल्या ईसापूर धरणातून रबी हंगामासाठी चार पाणीपाळ्या देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी नांदेडमध्ये केली आहे. या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळातही सुखावला असल्याचे चित्र आहे. या निर्णयामुळे नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीही आनंदीत झाले आहेत.
राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील हे गुरुवारी नांदेडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना नांदेड जिल्ह्यातील पाणी संकटाबाबत विचारले असता त्यांनी ईसापूर धरणातून चार पाणीपाळ्या सोडण्याबाबतचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले. इसापूर धरण आजघडीला ६९ टक्के भरले आहे. आगामी काळातील नियोजन लक्षात घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ईसापूर धरणाचे पाणी नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्यांना उपलब्ध होते. त्यामुळे ऐन दुष्काळात हे पाणी उपलब्ध झाल्यास रबी हंगामातील एक पीक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.त्याचवेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे. त्यामुळे ईसापुरचे पाणी हे नांदेड जिल्ह्यासाठी निश्चितच वरदान ठरले आहे.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ईसापुरचे पाणी सोडण्याबाबत मुंबई येथे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर नांदेडमध्ये आलेल्या विखे पाटलांनी ईसापूर धरणातील चार पाणीपाळ्या सोडण्याचा निर्णय घोषित केला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही याबाबत महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी ‘नांदेड स्क्रिप्ट’च्या माध्यमातून सुतोवाच केले होते. विष्णुपुरीसह जिल्ह्यातील जल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी पूर्णपणे राखीव ठेवण्यात आले आहे. त्यावेळी ईसापूर बाबत जलसंपदा मंत्री निर्णय घेतील असे जिल्हाधिकारी म्हणाले होते. त्यानुसार आता जिल्हाधिकारी विखे पाटील यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयाने निम्म्या नांदेड जिल्ह्याचा पाणी प्रश्न काही अंशी का होईना सुटला आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.



