
नांदेड – राज्यात सुरु असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा शेवट बुधवारी झाला. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आपल्या जन्मदात्या तान्हुल्या बाळाला सोबत घेऊन बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान शहरातील पीपल्स महाविद्यालयात करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने चिमुकल्या बाळासाठी पाळणा देऊन त्या मातेचा शैक्षणिक धडपडीसाठी गौरवही करण्यात आला
विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. या परीक्षेचा शेवट बुधवारी झाला. नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडली. केंद्रावर एकूण ८६१ परीक्षार्थी होते. या परीक्षेदरम्यान पीपल्स महाविद्यालयात शितल चंद्रकात चिते (२१) या मातेने आपल्या नवजात तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी बोर्ड परीक्षा दिली. पीपल्स कॉलेजमधील ते दृश्य पाहून अनेकांचा कंठ दाटून आला. शीतल जेव्हा बाळाला घेऊन आली, तेव्हा कॉलेज प्रशासनानेही माणुसकी दाखवली. तिची शिक्षणाची धडपड पाहून ही मुलगी एवढ्या कष्टाने येतेय, तर आपण तिच्यासाठी काय करू शकतो? असा विचार करून महाविद्यालयात मातृस्नेह कक्ष तयार करण्यात आला. या कक्षात बाळाला विश्रांतीसाठी पाळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आईची माया आणि तिला शिक्षणाची असणारी गोडी पाहून शितलचे सर्वत्र कौतुक झाले. बुधवारी परीक्षेचा शेवट झाला आणि शितलचा पीपल्स महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते बाळासाठी पाळणा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण काटेकोरपणे ठेवण्यात आले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले होते. बारावी बोर्डाची परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख प्रा. विजय कदम, सह केंद्रप्रमुख प्रा.जी.डी ताडोड, प्रा. डॉ. विनोद चव्हाण, शरद डहाळे, सूर्यकांत राऊत, संदेश लांडगे आदींनी परिश्रम घेतले.


