नांदेड – जिल्ह्यात वाळू माफिया जोमात असून मोठ्या प्रमाणात यंत्र सामुग्रीच्या सहायाने खुले आम अवैध वाळू उपसा केला जात आहे. स्थानिक पोलीस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असले तरी आता जिल्ह्यातील रेती घाटावर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची आता करडी नजर पडली आहे. लोहा तालुक्यातील कौडगाव घाटावर विशेष पथकाने कारवाई करून ५ हायवा ट्रक, १ टिपर, दोन पोकलेन मशीन, एक इंजिन बोट, एक फायबर बोटसह ५५ ब्रास वाळू असा २ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील कौडगाव, येळी, चिंचोली, कामळज येथील घाटावर मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. भरदिवसा हा अवैध वाळू उपसा स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा सर्व प्रकार अर्थपूर्ण संगनमतातून चालू असल्याचे स्पष्ट होत आहे. कौडगाव येथे १२ मार्च रोजी कारवाई करून २ कोटी ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ५ हायवा ट्रक, १ टिपर, दोन पोकलेन मशीन, एक इंजिन बोट, एक फायबर बोटसह ५५ ब्रास वाळूचा समावेश आहे. याप्रकरणी कृष्णाजी दशरथ भरकडे रा. कौडगाव, जेजेराव पंडित डोंगरे रा. वाळकी, उद्धव रामचंद्र भरकडे रा. कौडगाव, मोतीराम जळबा भरकडे रा. कामळज, रामदास चांदू उबाळे रा. मारतळा, मारुती अशोक पुरी रा. मेंबर ता. भोकर, कैलास भद्री पासवान रा. हजारीबाग झारखंड, बळीराम रामजी कल्याणे रा. वासरी ता. मुदखेड, सचिन हनुमंतराव भरकडे, चंद्रकांत संजय कदम, केशव एकनाथ भरकडे, ऋषिकेश माधवराव बन रा. कौडगाव, साईनाथ नारायण गिरडे रा. असदवन ता. नांदेड आणि आकाश राजू गजभारे रा. मारतळा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर कौडगाव येथील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपसा केलेली वाळू नांदेड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यामध्ये पुरवठा होत असल्याची बाब स्पष्ट झाल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने नमूद केले आहे. असे असताना जिल्ह्यातील स्थानिक पोलीस आणि महसूल यंत्रणा मात्र डोळे झाकून थंड पडली असल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई विशेष पोलीस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ, संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांनी केली. गेल्या काही दिवसापासून या पथकाने अवैध धंद्याविरुद्ध उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
दुसरीकडे ६ मार्च रोजी मुदखेड पोलीस ठाणे हद्दीत माळकौठा येथेही उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने २ हायवा ट्रक, १ जेसीबी मशीन, बोटसह ५० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा वाळू उपसा सुरू झाला होता. त्यावर स्थानिक मुदखेड पोलीस आणि महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात विनोद पाटील उबाळे रा. मारतळा ता. लोहा, विलास पाटील भरकडे, गजू पाटील हातणे आणि सतीश भरकडे रा. कौडगाव या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांचे पथक पुढे आणि स्थानिक पोलीस मागे असा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मुदखेड तालुक्यात टाकळी, वासरी, शंखतीर्थ या भागातही बोटींच्या सहायाने अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे.