Police

नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या भरतीत मुख्यालयातील शिपायानेच गोळा केले दहा लाख रुपये..!

भरतीमध्ये सहकार्य करतो म्हणून पैशांची केली मागणी, माहिती मिळताच नागनाथ नागरगोजेला केले तात्काळ निलंबित, जिल्हा पोलीस दलाचे दिले स्पष्टीकरण; भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षच..!

नांदेड – जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त असलेल्या १९९ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असताना लेखी परीक्षेच्या एक दिवस आधीच पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई नागनाथ माधवराव नागरगोजे यांनी उमेदवाराकडून पैसे मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. नागरगोजेने जवळपास दहा लाख रुपये गोळा केल्याची माहितीही पुढे आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांची आता विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा मात्र पोलिसांनी दाखल केला नाही. दुसरीकडे जिल्हा पोलीस दलाने नांदेडमधील जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत १९९ पदांसाठी १४ हजार ६८२ अर्ज आले होते. या उमेदवारांची ११ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. या मैदानी चाचणीमध्ये २ हजार ५५४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या उमेदवारांची १५ मार्च रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात लेखी परीक्षा घेण्यात आली. पण या लेखी परीक्षेच्या एक दिवस आधीच १४ मार्च रोजी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या नागनाथ माधव नागरगोजे या पोलीस अंमलदाराने भरतीमध्ये सहकार्य करतो म्हणून अनेकांशी मोबाईलवरती संभाषण करून अनेकांकडून पैशाची मागणी केल्याची बाब पुढे आली आहे. त्यांनी जवळपास दहा लाख रुपये जमा केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
याबाबतीत माहिती मिळताच पोलीस दलाकडून या प्रकाराची चौकशी करण्यात आली सदर चौकशी दरम्यान पोलीस अंमलदार नागनाथ नागरगोजे यांनी भरती प्रक्रियेतील उमेदवाराकडून पैसे मागितले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी माधव नागरगोजे यांना तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे. त्याचवेळी त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत मैदानी चाचण्या पार पडल्यानंतर लेखी परिक्षेसाठी २० दिवसांचा कालावधी लागला. या मोठ्या कालावधीत सहकार्य करण्यासाठी अनेक उमेदवारांना गंडविण्यात आले असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे नांदेड जिल्हा पोलीस दलाने जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने सुरू असल्याचे कळवले आहे. १५ मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शांततापूर्ण वातावरणात लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी ९८.६ उमेदवार हजर होते. बाहेरगाहून आलेल्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था ही पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली होती. पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान नांदेड पोलीस दलाकडून विविध प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या परीक्षा संपल्यानंतर एका तासाच्या आत अधिकृत उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर उत्तर सूची नांदेड पोलीस दलाच्या अधिकृत माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचवेळी उमेदवारांना उत्तर सूचीबाबत आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त हरकतींचा विचार करून त्याचे नियमानुसार निवारण करण्यात येईल, असेही पोलीस दलाने स्पष्ट केले आहे. लेखी परीक्षेदरम्यान उत्तर पत्रिका उमेदवारांना नेण्यास परवानगी देण्यात आली आहे भरलेल्या ओएमआर उत्तर पत्रिकेची कार्बन प्रत उमेदवारांना देण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा कक्षात व्हिडिओ कॅमेराद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात आली. परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवारांची तपासणी आणि संपूर्ण फ्रिस्किंग करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकाराची शक्यता टाळण्यात आली आहे.
त्याचवेळी भरती प्रक्रिया दरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनात किंवा अनियमिततेत सहभागी आढळलेल्या संबंधित कर्मचाऱ्या विरुद्ध कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे कळविले आहे. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही व्यक्तीकडून पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा बाहेरील व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या आमिष, प्रलोभन किंवा खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवू नये, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या कृतीपासून दूर राहावे व अशा बाबी निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असताना जिल्हा पोलीस मुख्यालयातील एका अंमलदाराने थेट पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस झाल्याने या भरती प्रक्रियेबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलीस मुख्यालयातच कार्यरत असलेले सदर पोलीस अंमलदार थेट भरती प्रक्रियेत सहभागी होते का ही बाबही पाहणे महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्याविरुद्ध आता परीक्षेच्या एक दिवस आधी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लेखी परीक्षेचे पेपर देतो म्हणून त्यांनी पैसे मागितल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे या लेखी परीक्षेबाबतही उमेदवारांमध्ये साक्षंकताच राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!