शैक्षणिक

पेपर फुटीप्रकरणी लातूर अन् कंधार फार्मसी महाविद्यालयाला नांदेड विद्यापीठाने ठोठावला मोठा आर्थिक दंड 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सात दिवसात मागवला खुलासा, संबंधित महाविद्यालयाला १२ लाखांचा दंडही भरावा लागणार, उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालानंतर झाली कारवाई

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटीप्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेत संबंधित दोन दोषी महाविद्यालयावर आर्थिक दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका महाविद्यालयाला १० लाख तर दुसऱ्या महाविद्यालयाला २ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

उन्हाळी-२०२६ सत्राच्या परीक्षा सुरू असताना बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या एका विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशानुसार उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालात संबंधित महाविद्यालयाची निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा पुढे आला आहे.

या पार्श्वभूमीवर ९ मे रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विषयाचे गांभीर्य, विद्यापीठाची झालेली बदनामी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत पेपर फुटी प्रकरणी संबंधित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर आणि कंधार कॉलेज ऑफ फार्मसी कंधार या महाविद्यालयांना आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात लातूर कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजला १० लाख रुपये तर कंधार कॉलेज ऑफ फार्मसीला दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील प्रवेश प्रक्रिया का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, पेपर फुटीच्या दिवशी घेण्यात आलेली संबंधित विषयाची परीक्षा विद्यापीठाने यापूर्वीच रद्द केली आहे.

यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी सांगितले, “विद्यापीठाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे भविष्यात अशा गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल.” विद्यापीठाच्या या धाडसी कारवाईमुळे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या संस्था आणि कॉपी बहाद्दरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!