
नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ज्या पदव्युत्तर पारंपारिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन (Academic & Administrative Audit – ‘AAA Online’) तपासणीमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण म्हणजेच ‘एफ’ ग्रेड मिळालेली आहे, अशा तब्बल २९ महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.
विद्यापीठाच्या तपासणीत त्रुटी आढळलेल्या व प्रतिबंधित केलेल्या यादीतील महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पारंपारिक पदव्युत्तर अभ्यासक्रमास कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश देऊ नये. जर एखाद्या महाविद्यालयाने या आदेशाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सर्व शैक्षणिक नुकसानीस ते महाविद्यालय प्रशासन जबाबदार असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय केवळ पारंपारिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहील. फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र यांसारख्या व्यावसायिक महाविद्यालयांना या निर्णय व कारवाईतून वगळण्यात आले आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या ‘AAA Score’ च्या एकूण ७२ महाविद्यालयांच्या यादीमध्ये केवळ पाच महाविद्यालयांना ‘O’ ग्रेड आणि ११ महाविद्यालयांना ‘A’ ग्रेड मिळवता आला आहे. तर ‘B’ ग्रेड १३ महाविद्यालये, ‘C’ ग्रेड ४ महाविद्यालये, ‘D’ ग्रेड ५ महाविद्यालये, ‘E’ ग्रेड ५ महाविद्यालये आणि सर्वात जास्त म्हणजेच एकोणतीस महाविद्यालये ‘F’ ग्रेड श्रेणीत फेकली गेल्याने त्यांच्यावर प्रवेश स्थगितीची ही नामुष्की ओढावली आहे. विद्यापीठाने प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचे (स्थगित करण्याचे) आदेश दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १८ महाविद्यालये, लातूर जिल्ह्यातील सात आणि परभणी जिल्ह्यातील चार महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. एम. के. पाटील यांच्या अहवालानंतर आणि विद्या परिषद व अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीतील ठरावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ॲफिलेशन (Affiliation) या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आली आहे.
‘एफ’ ग्रेड प्राप्त अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. ‘एफ’ ग्रेड श्रेणीत महाविद्यालयांची यादी अशी…वसंतराव नाईक महाविद्यालय (वसरणी, नांदेड), श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय (लोहा), पानसरे महाविद्यालय (अर्जापूर), शरदचंद्र आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (नायगाव), जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर (सिडको, नांदेड), वै. धुंडा महाराज देगलूरकर कॉलेज (देगलूर), कै. भीमराव चव्हाण आर्ट्स अँड सायन्स कॉलेज (चव्हाणवाडी, बऱ्हाळी), श्री रेणुकादेवी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (माहूर), राजीव गांधी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट (नांदेड), राजीव गांधी महाविद्यालय (मुखेड), एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मीडिया सायन्स (नांदेड), छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय (किनवट), विश्वभारती महाविद्यालय (सिडको, नांदेड), विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (नांदेड), छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालय (माहूर), सिंधू कॉलेज ऑफ आयटी अँड सायन्स (देगलूर), इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी (विष्णुपुरी, नांदेड), श्री गुरु गोविंदसिंग कॉलेज (बी.जे.) (नांदेड). संत संभाजी शिंदे कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फो. सायन्स (परभणी), डीएसएम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (परभणी), यशवंत कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (परभणी), रविंद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालय (परभणी). स्वामी विवेकानंद महाविद्यालय (शिरूर ताजबंद), श्री कुमारस्वामी महाविद्यालय (औसा), कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय (हाडोळी), सरस्वती संगीत कला महाविद्यालय (लातूर), श्यामगिरी महाविद्यालय, (दापका), मातृभूमी महाविद्यालय (उदगीर), ब्रिलियंट महाविद्यालय (रात्रीचे) (लातूर).


