Police

नांदेडमधील ‘त्या’ स्फोटाप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद 

मयत परभणीचा असल्याची माहिती, पोलीस रेकॉर्डवर अद्याप अनोळखी म्हणूनच नोंद, पोलिसांकडून तपासाबाबत कमालीची गुप्तता, वंचित बहुजन आघाडीने केली सखोल चौकशीची मागणी

नांदेड – नांदेडमध्ये ईदचा उत्साह शिगेला असताना नवीन नांदेडातील वाजेगाव बंधाऱ्याजवळील ईदगाह मैदानावर झालेल्या एका दुचाकी स्फोटाने संपूर्ण जिल्हा हादरला. प्रारंभी पोलिसांनी हा पेट्रोल टाकीचा स्फोट असल्याचे सांगून या विषयाला एक अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला; मात्र घटनास्थळावर सापडलेल्या अनेक संशयित वस्तू आणि स्फोटात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य पुढे आले. पोलीस दलाच्या सर्वच यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. तपासाला सुरुवात झाली. नांदेड ग्रामीण ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाजेगाव स्फोटाच्या २४ तासानंतरही या प्रकरणात पोलीस दलाकडून अद्याप कोणतीही परिपूर्ण माहिती देण्यात आली नाही. त्याचवेळी या घटनेचा सर्वच अँगलने तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गोदावरी नदी पात्रावरील वाजेगाव बंधाऱ्यावर २१ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक व्यक्ती दुचाकीने वाजेगावकडे जात असताना अचानक दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकीवरील व्यक्ती जळून जागेवर मृत्युमुखी पडला. याप्रकरणी वाजेगावचे पोलीस पाटील बालासाहेब सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे हे करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य पाहता नांदेड जिल्हा पोलीस दलाने सतर्क होत या घटनेचा तपास सर्वच अँगलने सुरू केला आहे. ईदगाह मैदानाजवळ ऐन ईदच्या दिवशी झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलाकडून आवश्यक तो सर्व तपास केला जात आहे.

ईदच्या दिवशीच घडलेल्या या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी नांदेड शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद यांनीही या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. वाजेगाव घटनेसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेडमधील घटनेची सखोल, पारदर्शक आणि शास्त्रीय चौकशी सुनिश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. वैज्ञानिक विश्लेषणासह न्यायवैद्यक तपासणी केली पाहिजे आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे,  मृत व्यक्तीच्या डिजिटल प्रोफाइल आणि सोशल नेटवर्कची सखोल चौकशी करावी, वापरलेल्या स्फोटक पदार्थांची तपासणी करावी आणि त्यांच्या पुरवठा साखळीचा मागोवा घेण्यात यावा,  मृत व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीची आणि कोणत्याही संभाव्य चिथावणी किंवा बाह्य प्रभावाची चौकशी करावी, जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण चौकशी पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने करणे आवश्यक असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे फारुक अहमद, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, रवी पंडित, ॲड. शेख बिलाल, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे, विठ्ठल गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, शंकर महाजन आदींची यावेळी उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!