
नांदेड – नांदेड शहरात झालेल्या खुनाच्या मालिकेतील सोनू कल्याणकर खून प्रकरणात आता रिंदा गँगचा सदस्य आणि सध्या तुरुंगात असलेल्या गोलू मंगनाळेची आई इंदूबाई मंगनाळेविरुद्धही आता गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात कटाची मुख्य सूत्रधार इंदूबाईच असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मारेकऱ्यांना बँकेतून पैसे काढून दिले होते ही बाबही तपासात पुढे आली आहे.
नांदेड येथे श्रीनगर येथील कुमार ड्रेसेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर ६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजेदरम्यान अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हा खून आरोपींतानी मुलीची सोयरीक मोडल्याच्या कारणावरून आणि मयत सोनू कल्याणकरचे मुलीसोबत प्रेम संबंध असल्याचा राग मनात धरून करण्यात आल्याचे अशोक कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
सोनू कल्याणकरचे गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी नाईनगर येथील चंद्रविजय मंगनाळेच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते; परंतु वडील आणि भावाचा त्या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यामुळे मुलीचे दुसरीकडे लग्न जुळवले होते; मात्र ते लग्न सोनू कल्याणकरने मोडल्याचा आरोपावरून त्याच्यावर २०२० मध्ये विमानतळ पोलिस ठाण्यात चंद्रविजय मंगनाळे यांनी तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी सन २०२१ मध्ये गोलू मंगनाळे याने त्याच्या साथीदारांसह सोनू कल्याणकरवर राहत्या घरी गोळीबार केला होता. त्यावेळी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासूनच सोनू कल्याणकर याला मारण्यासाठी चंद्रविजय मंगनाळे आणि त्याचा मुलगा गोलू मंगनाळे हे कट रचत होते. याच कटात आता गोलू मंगनाळेची आई इंदूबाईही सहभागी असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोळी घालून पकडलेल्या रोहित लोट याला काही रक्कम इंदुबाईने काही दिवसांपूर्वी दिली गेली होती. त्यानंतर यातील काही रक्कम खुनात सहभागी असलेल्या शिंदे हा खुनाचा कट पूर्णत्वास गेला होता. आता पोलिसांनी इंदूबाईला अटक केली आहे. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी इतर आरोपींचीही एक दिवस पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे. भाग्यनगर पोलिसांनी आतापर्यंत चंद्रविजय मंगनाळे, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंदनवाड आणि मधु जोगदंड या सहाजणांसह इंदूबाई मंगनाळेविरुद्धही गुन्हा दाखल केले आहेत.



