क्राईम

नांदेडमध्ये आणखी एक पिस्टल जप्त..!

एपीआय भागवत नागरगोजे यांच्या पथकाची कामगिरी, माता गुजरीजी चौकात दोन खंजीरसह दुचाकीही केली जप्त

नांदेड – नांदेडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे विमानतळ ठाणे हद्दीतील माता गुजरीजी चौकात एक पिस्टल आणि दोन खंजर आणि एक दुचाकी जप्त केली आहे याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले करण्याची प्रक्रिया सुरू आहे करण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्यानंतर पोलिसांनी आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दर्शनी यांच्यासह विमानतळ ठाण्यातील अंमलदारासोबत पेट्रोलिंग आणि वाहतूक केसेस केले जात असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माता गुजरीजी चौकात खुशालसिंघ नानकसिंघ गिल वय २२ वर्ष रा. कोलतानवाडी हर्सूल ता. जि. संभाजीनगर हल्ली मुक्काम पाण्याच्या टाकीजवळ नंदिग्राम सोसायटी नांदेड याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एक धारदार खंजीर, एक पिस्टल असे घातक शस्त्र व एक मोटरसायकल सापडली. खुशालसिंघ नानकसिंघ गिल हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही समोरे आली. त्याचवेळी जयमितसिंग बलवीर सिंग शाहू वय -२२ वर्षे रा. पोस्ट ऑफिसच्या बाजूला अष्टविनायक नगर हिंगोली हल्ली मुक्काम सेक्टर ३ अबचलनगर, नांदेड याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडेही एक धारदार खंजीर सापडला.

या कारवाईत आरोपी खुशालसिंघ नानकसिंघ गिल याच्या ताब्यातून २५ हजार रुपयाची लोखंडी पिस्टल मॅक्झिनसह, ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, अडीच हजार रुपये किमतीचा लोखंडी धारदार खंजीर, जयमितसिंग बलवीरसिंग शाहू याच्या ताब्यातून एक लोखंडी धारदार खंजीर किंमत अडीच हजार रुपये व ७० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचे दोन आरोपी दोन धारदार खंजीर, एक पिस्टल, व एक विना नंबरची मोटरसायकल असा मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, नागरगोजे यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी नवीन कौठा येथील आशिष भुजंग भालेराव आणि श्रीनिवास अनिल जाधव या दोघांकडून खंजर आणि दोन मोबाईल जप्त केले. जप्त केलेली एमएच २६ बीजी ६०२८ ही दुचाकी नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याची बाबही पुढे आली आहे. या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!