सांस्कृतिक

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली..!

माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी दिला आठवणींना उजाळा

नांदेड: “मला नांदेडला यायचं आहे, गुरुद्वारात दर्शन घ्यायचे आहे. आपण लवकरच कार्यक्रम ठरवूया,” असा शब्द देणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांची नांदेड भेटीची इच्छा अखेर अपूर्णच राहिली. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आशाताईंच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना खा. चव्हाण यांनी त्यांच्याशी असलेल्या स्नेहबंधांना उजाळा दिला. ९० च्या दशकात आशाताई नांदेडला आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी येण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असेही त्यांनी नमूद केले. खा. चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये एका खास प्रसंगाचा उल्लेख केला आहे. “कोरोना काळानंतर आमचे एक स्नेही प्रसाद महाडकर यांचा फोन आला आणि त्यांनी आशाताईंशी बोलणे करून दिले. त्यांनी नांदेडला येण्याची इच्छा बोलून दाखवली. मी देखील आनंदाने त्यांना निमंत्रण दिले, मात्र नियतीला हे मान्य नव्हते आणि तो योग कधीच जुळून आला नाही,” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली.

नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी देखील आशाताईंना निमंत्रित केले होते. नांदेडकरांना त्यांचे जादुई सूर प्रत्यक्ष ऐकता यावेत, अशी माझी इच्छा होती. परंतु, त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आशाताईंना येता आले नाही. त्यांच्या निधनामुळे ही संधी आता कायमचीच हुकल्याची सल खा. चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!