
नांदेड : सांगवी परिसरातील जमिनीचा वाद वाढतच चालला आहे. याच वादातून काँग्रेस नगरसेविका आफिया नाज यांचे पती काजी नाफे यांच्या विरोधात शेतकऱ्याला अडवून, दोन धर्मात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी नगरसेविकेचे पती काझी नाफे यांच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करून तक्रार केली होती. त्यात आता गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात प्रल्हाद शंकरराय कोकाटे यांची मौजे सांगवी बु. शिवारात गट क्र. ३३६ मध्ये ६५ गुंठे जमीन आहे. या जमिनीवर कोकाटे मागील काही महिन्यांपासून प्लॉटिंग करून विक्री करत आहेत. १५ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कोकाटे आणि त्यांचा भाऊ आपल्या जागेवर थांबलेले असताना, प्रभाग क्र. दोनच्या नगरसेविका पआफिया नाज यांचे पती काजी नाफे तिथे आले. त्यांनी ही जमीन मुस्लिम स्मशानभूमीची असल्याचे म्हणत प्लॉटिंगच्या कामाला विरोध केला.
कोकाटे यांची ही वडिलोपार्जित जमीन असतानाही काजी नाफे याने चुकीचा दावा केला आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे वक्तव्य केले. याप्रकरणी कोकाटे यांनी धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगत फिर्यादीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम २९९, ३२९(३) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जमिनीचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असताना त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न नगरसेविका पती काझी नाफे यांनी केला आहे. या गुन्ह्यात इतरही व्यक्तींचा समावेश आहे का? याचाही विमानतळ पोलीस आता तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे स्वतः करीत आहेत.



