
नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रात चालणाऱ्या अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या अधिपत्याखालील पथकाची नांदेड जिल्ह्यात रवानगी केली. याच विशेष पथकाच्या हातून शनिवारी अर्धापूर येथील कारवाईत अनेक जुगारी निसटले आहेत. यावेळी १२ दुचाकी पोलिसांनी पकडल्या असल्या तरी केवळ तीन जुगारी हाती लागले आहेत. या डावावर असलेले इतर ८ ते १० जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
अर्धापूर येथील उमर कॉलनीत असणाऱ्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी धाड टाकली. या पथकाची चाहूल लागल्याने अनेक जुगारी पळून गेले. मात्र, त्यातील नागेश केशव राजेगोरे, रा. शेलगाव ता. अर्धापूर, किशन मधुकर लोणे रा. लोण ता. अर्धापूर आणि शंकर दादाराव कराळे राहणार रामनगर, जुना कौठा नांदेड हे तीन जुगारी विशेष पथकाच्या हाती लागले. त्यांच्याकडून १० हजार ३०० रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य व १२ मोटार सायकली असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाणे येथे गुरनं २०७/२०२६ कलम १२ (अ), महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ बोदेमवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे.नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेल्या ‘खबर’ या हेल्पलाइन वर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.



