
नांदेड – नांदेड शहरातील भारत ई-स्क्वेअरजवळील तिहेरी खून प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर आणि शेख उबेद शेख अजगर या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने तेलंगणातून सोमवारी शिताफिने जेरबंद केले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
नांदेडमध्ये भारत ई-स्क्वेअरजवळ ४ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग गजानन चव्हाण हा त्याच्या मित्रासोबत ई-स्क्वेअर येथे चित्रपट पाहून कॅनॉल रोडने घरी जात होता. त्यावेळी साईलाला, शाहरुख कबूतर, सोनू राऊत, आवेश सय्यद, मोहम्मद अरबाज, उबेद आणि साहेर यांनी जुन्या वादातून प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग याच्यावर चाकू, तलवारीने हल्ला केला. यात अर्जितसिंग जागीच ठार झाला होता. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी सोनू राऊत आणि साहेर या दोघांना अटक केली होती.
या गुन्ह्यातील साईलाला, शाहरुख कबूतर, उबेद हे तिघेजण गुन्हा घडल्यापासून फरार होते. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेश देत गुन्हेगारांना जेरबंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने पाच पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाला शेख शाहरुख उर्फ कबुतर शेख आणि शेख उबेद शेख अजगर या दोघांची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या दोघांनाही तेलंगणातून २० एप्रिल रोजी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी त्यांना आता पुढील चौकशीसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
साई लालाला सहकार्य करणाऱ्या दोघाविरुद्ध कारवाई …या तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी साईलाला याला ल फरार असताना सहकार्य करणाऱ्या मन्मथ वसंतराव मंगरुळे रा. नायगाव आणि दिग्विजय गणेशराव नारागुडे रा. श्यामनगर नांदेड या दोघाविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांकडून साईलालाचाही कसून शोध घेतला जात आहे. शाहरुख कबूतर आणि उबेद आता ताब्यात आल्यानंतर साईलालालाही लवकरच जेरबंद करू, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या तिहेरी खुनाच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ उडाली होती.
साई लालाला सहकार्य करणाऱ्या दोघाविरुद्ध कारवाई …


