क्राईम

इस्लामपुरा दुर्घटनेतील कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण 

ठेकेदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शनला पाठीशी घातले जात असल्याचा होत आहे आरोप, नाल्याच्या कामात चार मुलांचा बुडून झाला होता मृत्यू

नांदेड – नांदेड महापालिकेकडून सुरू असलेल्या इस्लामपुरा भागात एका नाल्याच्या कामात चार बालकांचा १६ एप्रिल रोजी बुडून मृत्यू झाला होता. या कामात महापालिका ठेकेदाराचा बचाव करीत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या गंभीर दुर्घटनेत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, जे दोषी आहेत त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोण कोण या कचाट्यात येईल याकडेही लक्ष लागले आहे.

देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनजवळ १६ एप्रिल रोजी इस्लामपुरा भागातील राहणारी १० ते १३ वयोगटातील चार मुले खड्यात साचलेल्या पाण्यात बुडाली. महापालिकेमार्फत या ठिकाणी नाल्याचे काम सुरु होते. त्याअनुषंगाने कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता शिवकन्या जायभाये व कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांच्यावर महापालिका आयुक्तामार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचवेळी कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, प्लॉटधारक मो.युसुफ मकरानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. हा गुन्हा दाखल करताना थेट ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

या कारवाईत महापालिकेकडून ठेकेदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शनचा बचाव केला जात असल्याचा मोठा आरोप होत आहे. याविषयी माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांना विचारणा केली असता ही घटना अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. महापालिकेने अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई केली आहे. त्याचवेळी आणखी कोणी संबंधित दोषी असतील तर त्यांनाही निश्चितपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात नांदेड महापालिकेने बुधवारी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनच्या पाठीमागे इस्लामपुरा भागात खड्यात साचलेल्या पाण्यात बुडुन चार शाळकरी मुलांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदरील प्रकरणी महानगरपालिकेने नियमानुसार आवश्यकती कार्यवाही केली आहे. सदरील प्रकरणात चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा फरहतउल्ला बेग यांची व्दिसदस्यीय समिती घटनेच्या दिवशीच नेमण्यात आली होती. समितीला २४ तासांच्या आत अहवाल देण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. चौकशी समितीने २४ तासांच्या आत सादर केलेल्या अहवालानुसार कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे शिवकन्या जायभाये, उप अभियंता (सा.बा.वि.) आणि किरण सुर्यवंशी कनिष्ठ अभियंता (सा.बा.वि.) यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री दिलीप टाकळीकर, प्र.कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभागातील प्रकाश कांबळे, उप अभियंता व म.जकीउल्ला खान यांना कामात निष्काळजीपणा केल्याबाबत निलंबीत का करण्यात येवू नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस देवुन (४८) तासाच्या आत खुलासा मागितला.

पोलीस स्टेशन इतवारा यांनी १६ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेच्या अंनुषंगाने मागविलेल्या लेखी माहितीनुसार १७ एप्रिल रोजी सदर प्रकरणाची माहिती पुरविण्यात आली आहे. सदर दुर्घटनेस जबाबदार असलेले कंत्राटदार मे.गुरु रामदास कंन्स्ट्रक्शन, नांदेड यांचे संबंधित प्रकल्प अभियंता /प्रकल्प पर्यवेक्षक /कामावर देखरेख करणारे व्यक्ती व घटनास्थळाच्या पुर्वेस प्लॉट नं.5, सर्व्हे नं.158, आयशा पार्क येथील खाजगी बांधकामधारक मो.युसूफ मकराणीविरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी प्र.शहर अभियंता सुमंत पाटील यांना प्राधिकृत करण्यात आले होते. प्राधिकृत अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन इतवारा येथे गेले असता त्याचदिवशी या प्रकरणात मयताचे नातेवाईक सय्यद फेरोज सय्यद गैस यांनी इतवारा पोलीस स्टेशन येथे कामात निष्काळजीपणा करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शहर अभियंता सुमंत पाटील यांना प्राधिकृत केल्यानुसार शहर अभियंता यांनी १८ एप्रिल रोजी कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, नांदेड यांचे संबंधीत पर्यवेक्षक सुरेश शेषेराव सोनकांबळे तसेच नाल्याचा प्रवाह मुरुम साहित्याचा भरणा करुन रोखणारे खाजगी बांधकाम धारक मो.युसुफ मकराणी यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दाखल केली असता या प्रकरणात मयत नातेवाईकामार्फत यापूर्वीच एफआयआर दाखल झालेली असल्याने पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेची स्वतंत्र एफआयआर न घेता यापूर्वी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये महापालिकेच्या तक्रारीची नोंद घेऊन मुळ तक्रारीमध्ये आरोपींची नावे समाविष्ट केली आहेत.या दुर्घटनेस जबाबदार असलेले कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन,नांदेड यांना दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यासाठी निर्देशीत केल्यानुसार संबंधीत कंत्राटदाराने मयत मुलाच्या नातेवाईकास प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ६० लाख रुपये नुकसान भरपाई दिली असल्याचे कळविले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!