राजकीय

चिखलीकर म्हणतात… पक्षाचा नाही तर अपक्ष उमेदवारही रिंगणात राहू शकतो..!

विधान परिषद निवडणुकीबाबत नांदेडमध्ये मध्यरात्री राजकीय खलबत, खा. श्रीकांत शिंदेंची चिखलीकरांनी घेतली भेट, हुकूमशाही मोडीत काढण्याचे प्रयत्न 

नांदेड – विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना नांदेडमध्ये आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. बुधवारी मध्यरात्री शिवसेना शिंदे सेनेचे नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका हॉटेलमध्ये भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेचा तपशील हाती येऊ शकला नसला तरी यामध्ये राजकीय चर्चाही होती ही बाब आ. चिखलीकर यांनी मान्य करताना नांदेडची विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार नसल्याचेच स्पष्ट केले. त्याचवेळी हुकुमशाही मोडून काढण्यासाठी प्रयत्न करणारच अशी स्पष्ट भूमिकाही चिखलीकर यांनी घेतली.

शिंदे सेनेचे नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे बुधवारी नांदेडमध्ये दाखल झाले. प्रारंभी त्यांनी कौठा भागात पक्षाची एक संघटनात्मक बैठक घेतली. त्यानंतर ते शहरातील एका शाही हॉटेलमध्ये निवासासाठी पोहोचले. मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आपल्या मोठ्या लवाजम्यासह तेथे पोहोचले. ही बाब पाहून काहींनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी आ. चिखलीकर यांनी डॉ. शिंदे हे महायुतीचे प्रमुख नेते असल्याचे सांगितले. आपण खासदार असताना तेही लोकसभेत आपले सहकारी असल्याचे सांगत ही भेट पूर्व नियोजित असल्याचे सांगितले. असे असले तरी नांदेडमध्ये सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. शिवसेना नेते आ. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर, जिल्हाध्यक्ष विनय गिरडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. चिखलीकर यांनी बंद दाराआड काय चर्चा झाली याबाबत विचारले असता भेट झाल्यावर सर्वच विषयावर चर्चा होते असे सांगितले. त्यात विधान परिषद निवडणूक, आगामी जिल्हा परिषद निवडणूक तसेच अन्य विषयांवरही चर्चा झाली असल्याचे सांगीतले. विधान परिषद निवडणुकीत ज्या उमेदवाराला महायुती तिकीट देईल त्याव्यतिरिक्त इतर उमेदवार हे अपक्ष राहतील हे स्पष्ट आहे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे आपल्याला वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, बाळासाहेब रावणगावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, माधव पावडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!