राजकीय

नांदेड जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेकडे धाव..!

संघटन सृजन अभियान निवडीत अन्याय झाल्याची बालाजी चव्हाण, केदार साळुंकेची थेट राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी चव्हाट्यावर, खासदार रवींद्र चव्हाणवर केले आरोप

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये संघटन सृजन अभियान मोठा गाजावाजा करत राबविण्यात आले; मात्र निवडी करत असताना केवळ खांदेपालटच करण्यात आल्याने जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. संघटन सृजन अभियानाचे प्रभारी वेणुगोपाल यांनी दिलेल्या अहवालाला केराची टोपली दाखवत नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून सर्वच निवडी करून घेतल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले बालाजी चव्हाण व नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या केदार पाटील साळुंके या दोघांनी थेट दिल्ली गाठत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन निवड प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार केली आहे.

काँग्रेसच्या नांदेड दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्षसह शहर अध्यक्ष निवडण्यासाठी जिल्ह्यात अखिल भारतीय काँग्रेसकडून संघटन सृजन अभियान राबवण्यात आले. त्यातून फार मोठे संघटनात्मक बदल केले जातील अशा मोठा वल्गना पक्षनिरीक्षक, तेलंगणाचे मोठे अनुभवी नेते हरकरा वेणूगोपालराव यांनी करत त्यांनी जिल्ह्यात नऊ दिवस मुक्काम करून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन कार्यकर्त्यांची मते एकांतात जाणून घेतली. त्याचा अहवाल तयार करत ही प्रक्रिया पारदर्शक असून यात लोकप्रतिनिधीसह कोणाचाच हस्तक्षेप चालणार नसल्याचा भरोसा दिला. त्यात निवडी होण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक नावाची चाचपणी करून त्यास प्राधान्यक्रम दिला आणि आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेसकडे सुपूर्द केला. त्यात नांदेड दक्षिणसाठी खासदार राहुल गांधी यांच्या तीनही अभियानात काम केलेले संघटनेचा अनुभव व येथील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी लक्षात घेता एक नंबरला केदार पाटील साळुंके यांचे नाव शिफारशीत गेलेले असताना खासदार रवींद्र चव्हाण यांनी या पदासाठी अर्जही केलेला नसताना, काँग्रेसमध्ये एक पद एक पदाधिकारी अशी संकल्पना असताना त्यांची निवड झाल्याने जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.

नांदेड शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी अब्दुल सत्तार यांच्या जागी त्यांचाच मुलगा अब्दुल गफर यांची निवड करण्यात आली. त्यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते होण्यासाठी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने त्यांना काँग्रेसच्या मोठ्या गटाने विरोध केलेला होता. त्यांचे नाव या अभियानात शेवटी असताना बालाजी चव्हाण यांचा संघटनात्मक कामाचा अनुभव लक्षात घेता पदाधिकाऱ्यांनी त्यांची केलेली शिफारस लक्षात घेता त्यांचे नाव एक नंबरला असताना त्यांनाही डावलण्यात आले. नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठीही महिला किंवा ओबीसी देण्याचे अहवालात सुचवलेले असताना जिल्ह्याच्या नेत्यांनी भाजपात अशोक चव्हाण सोबत जाऊन आलेले विठ्ठल पावडे यांची वर्णी लावली असल्याचा आरोप थेट काँग्रेस खासदारांवर केला आहे. सर्वच कार्यकर्ते समान असताना अहवालानुसार निवड होऊ देण्याऐवजी त्यात मोठा हस्तक्षेप करत संघटन सृजनचा अहवाल केराच्या टोपलीत टाकत आपल्या मर्जीनुसार निवडी करून घेतल्याने आपल्यावर अन्याय झाला असून न्याय देण्याची मागणी थेट दिल्ली गाटत काँग्रेसचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुनजी खर्गेसह केंद्रीय नेतृत्वासमोर केलेली आहे. समवेत किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील चिमेगावकर, जिल्हाध्यक्ष माधव पाटील पवळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!