नांदेड – स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ग्रामीण पोलीस, सोनखेड पोलीस, लिंबगाव पोलीस यांनी संयुक्तपणे चार दिवसापूर्वीच केलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा मार्कंड येथे अवैध वाळू उपसा सुरूच असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या अवैध वाळू उपसावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून २४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे मार्कंड, भनगी, विष्णुपुरी, पिंपळगाव या भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्याला नेमका कुणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न पुढे येत आहे. आतापर्यंत पोलिसांकडून येथे सातत्याने झालेल्या कारवाईचा कोणताच प्रभाव वाळू माफियांवर झाला नाही हेही विशेष..!
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत २० जून रोजी पहाटे मार्कंड येथे गोदावरी नदी काठावरून अवैध वाळू उपसा सुरू होता. ग्रामीण पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून पाण्यावर तरंगणारे वीस तराफे, रेती उपसा करणारे ०४ इंजिन, ४५ ब्रास रेती असा एकूण २४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईदरम्यान दोन अनोळखी इसम पोलिसांना पाहून पळून गेले. या प्रकरणात अनोळखी इसमाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसुमे, विठ्ठल भिसे, शेख गफार इस्माईल, जीवन तेलंग, विनोद पवार आदींनी केली आहे.
१६ जून रोजी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत १२, इंजिन,११ बोटी, २३७ तराफे, ३२ ब्रास रेती असा एकूण ३ कोटी २१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणात १६ जणांविरुद्ध पोलिसांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हेही दाखल केले आहेत. यामध्ये प्रसाद कळके, सचिन कळके रा. कल्हाळ, हॅप्पी शिलेदार, अमित हंबर्डे, अरुण लुटे रा. विष्णुपुरी, पवन येवले, मोहन येवले रा. मार्कंड, रमेश गच्चे, रघुनाथ मोरे, पवन मोरे, भागवत मोरे रा. भनगी, विकास डक रा. पिंपळगाव, मनोज क्षीरसागर रा. बोरगाव, विवेक राजू सोनटक्के रा. गंगावेट मोतीराम सोनटक्के आणि पुंडलिक सोनटक्के रा. वाहेगाव या सर्वांचा समावेश होता. या कारवाईत पोलिसांनी ११ बोटी व १२ इंजन पाण्याच्या बाहेर काढणे शक्य नसल्याने जिलेटीनच्या सहाय्याने तसेच २६७ तराफे जाळून नष्ट केले होते.
एकीकडे नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांना अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीनंतर नांदेड कंट्रोल रूमला अटॅच करतात; पण त्याचवेळी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्याच हाकेपासून अंतरावर थेट विष्णुपुरी प्रकल्पातून, असर्जन परिसरातून भरदिवसा पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पालाही काही अंशी धोका निर्माण झाला असला तरी सिंचन विभागाचे संबंधित अधिकारीही त्याकडे डोळेझाकच करत आहेत. त्याचवेळी स्थानिक गुन्हा शाखेसह तीन पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईनंतर अवघ्या चार दिवसातच मार्कंड येथे पुन्हा एकदा पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अवैध वाळू माफियावर पोलिसांचा वचक राहिला नाही की पोलीस आणि अवैध माफीयांची हात मिळवणी झाली काय असाच संशय निर्माण होत आहे.