
नांदेड – श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नांदेडमध्ये भाविकांकडून तयारी सुरू आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी श्रींची स्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. येत्या आठ दिवसात दुरुस्तीचे हे काम पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांनी दिली.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. काही रस्त्यांचे काम सुरू आहे. शहरातील काही रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात होती. महापालिकेने ही मागणी लक्षात घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम त्वरित हाती घेतले आहे. शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांची काळजी घेतली जात आहे. शहरात काही रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिल्या आहेत.
शहरातील तरोडा भागातील झेंडा चौक ते जैन मंदिर, पिवळी गिरणी, लालवाडी, पारसनगर, आनंदनगर, टिळकनगर, मगनपुरा, हिंगोली गेट अंडर ब्रीज या भागातील रस्ते दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. इतर रस्त्यांची दुरुस्तीही लवकरच केली जाणार आहे. जे रस्ते सिमेंट काँक्रेटची आहेत तेथे काँक्रीटचेच पॅचवर्क केले जात आहे तर जे अंतर्गत रस्ते कच्चे आहेत तिथे खडी आणि मुरूम टाकून रस्ता दुरुस्त केला जात असल्याचे टाकळीकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वी हे रस्ते दुरुस्तीचे काम निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असेही ते म्हणाले.



