
नांदेड – मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी झालेल्या नांदेडच्या दोन्ही स्थानिक आमदारांना मोर्चातून हाकलून लावत रोष व्यक्त केला होता.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये गुरुवारपासून मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. काल रास्ता रोकोनंतर आज शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली. शहरातून राजकारणाचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला. मराठा आंदोलकांकडून आक्रमक आंदोलने होण्याची शक्यता असल्याने पोलिस विभागाने दक्षता घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वच लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शुक्रवारी राज कॉर्नरपासून निघालेल्या मोर्चात काही वेळ सहभागी झालेल्या नांदेड दक्षिण आणि उत्तरच्या आमदारांना आंदोलकांनी अक्षरशः मोर्चातून हाकलून लावले. लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलकांची संतप्त भावना झाली आहे. नांदेडमधील स्थानिक आमदार हे रील स्टार असल्याचा थेट आरोप करताना नांदेडमधील दोन्ही आमदारांनी मोर्चात सहभागी होऊन फोटो काढणे, रिल तयार करणे या ऐवजी विधानसभेत हा प्रश्न मांडावा, आपल्या सरकारकडून तो सोडवावा, अशी भावना व्यक्त करताना दोन्ही आमदारांना मोर्चातून हाकलण्यात आले. आंदोलकांचा राजकीय नेत्याबाबत रोष दिसून येत आहे. आंदोलनकर्त्यांच्या या संतप्त भावना लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात नऊ आमदार, दोन राज्यसभेचे खासदार, दोन लोकसभा खासदार आणि दोन विधान परिषद सदस्य असे एकूण १५ लोकप्रतिनिधी आहेत. या सर्वच नेत्याच्या निवासस्थानी पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.. मराठा आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे..



