क्राईम

नांदेडमध्ये महापालिकेने बीओटीवर दिलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये आता दारू विक्रीसह थेट देहविक्रीही..! 

स्थानिक गुन्हा शाखेने वेलनेस स्पा मध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराचा केला भांडाफोड, नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे, पुणे येथील सात महिलांची केली सुटका

नांदेड – नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये आता दारू विक्रीसह थेट देह विक्रीही सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने बीओटी तत्त्वावर ही जागा एका खाजगी विकासकाला दिली आहे. या ठिकाणी आता नेमके कोणकोणते व्यवसाय सुरू केले आहेत याचा उलगडा शहरवासीयांपुढे हळूहळू होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या मार्केटमध्ये हाय लेव्हलचे बार अँड रेस्टॉरंट सुरू झाल्याची माहिती पुढे आली होती आणि बुधवारी याच इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याचा भांडाफोड पोलिसांच्या कारवाईतून झाला आहे.

बुधवारी महापालिका फुले मार्केट येथे वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच हे स्पा सेंटर सुरू होते. वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली थेट देह व्यापार सुरु होता. या गैरप्रकाराची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. वेलनेस स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहकाकडून चार हजार रुपये घेण्यात आले. या बनावट ग्राहकाने इशारा देताच एलसीबीच्या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी तिथे नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे, पुणे अशा भारतभरातील वेगवेगळ्या ठिकाणावरील सात महिला आढळल्या. या सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. स्पा सेंटरमधून तीन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. या स्पा चा मॅनेजर आसाम येथील हिफजुर रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद यांना अटक करण्यात आली तर स्पा मालक संतोष बघे फरार आहे. पोलिसांनी या कारवाईत मोबाईल रोख रक्कम आदी १ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपरोक्त चौघाविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस निरीक्षक राजेश पुरी, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर, यशोदा केंद्रे यांनी पार पाडली.

नांदेड महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी नगरातील महात्मा फुले मंगल कार्यालय एका खाजगी विकासकाला बीओटी तत्त्वावर हस्तांतरित केले होते. महामानवाच्या नावे असलेल्या या व्यापारी संकुलात काही दिवसापूर्वीच एक दारू दुकान सुरू झाले असल्याचे समोर आले. या दुकानाला प्रारंभी काही नागरिकांनी विरोध केला मात्र तो विरोध मावळला असल्याचे दिसत आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक नेत्याने या परिसरातील झगमगाट पाहून येथून जाताना विदेशातून जात असल्याचा भास होत असल्याचे भाषणात सांगितले होते. त्यामुळे विदेशातील अशा वेगवेगळ्या सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत की काय असा प्रश्न पुढे येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!