
नांदेड – श्री गणेशोत्सव काळात नांदेडमध्येही डीजे बंदी राहणारच असे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात गणेशोत्सव काळात कोणीही डीजे लावू नये, डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य वाजविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेश मंडळांना करण्यात आले आहे. त्याचवेळी कोणीही डीजे लावल्यास संबंधित मंडळ तसेच त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून डीजे जप्त करण्यात येईल असा इशारा पोलीस विभागाच्या वतीने दिला आहे.
जिल्ह्यात श्री गणेशोत्सवाची तयारी भक्तांकडून केली जात आहे. त्याचवेळी प्रशासकीय पातळीवरही हा गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात डीजे बंदीच्या विषयावरून वादंग उठलेले असताना नागपूर येथे डीजे बंदीचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काढले आहेत. त्यापाठोपाठ आता नांदेडमध्येही डीजे बंदीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिले आहेत. श्री गणेशोत्सवासह जिल्ह्यात आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सवाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेड जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणाचा वेगळा संदेश द्यावा तसेच गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी परस्पर सौहार्द, शांतता व सर्वधर्मसमभाव राखून सण साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले होते. त्याचवेळी डीजे बंदी राहील असेही स्पष्ट केले होते.
गणेशोत्सव काळात कोणालाही त्रास होणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा अशा सूचना दिल्या होत्या. गणेशोत्सव शांततेत आणि सर्वधर्मसमभावाने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सोशल मीडियावरील संदेश आणि पोस्टची सत्यता पडताळून पहावी, उत्सव काळात कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे त्याचवेळी नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केले होते. डीजे बंदी केली जाईलच असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीनंतर दोन दिवसात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डीजे बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कोणीही डीजेचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांसह डीजे मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून डीजे जप्त करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.



