
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील वीज प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह इतर तीन खासदार आणि जिल्ह्यातील पाच आमदारांच्या उपस्थितीत महावितरणची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचीही उपस्थिती होती. जिल्ह्यातील वीज प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आता जिल्ह्यातील वीज प्रश्न तातडीने सुटतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज ग्राहक गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रचंड प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महावितरणचा कारभार हा नागरिकांसाठी एक प्रकारे वैताग आणणाराच झाला आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही अनेक वेळा महावितरणच्या कारभारावर बोट ठेवले असले तरीही त्यात कोणतीहीही सुधारणा झाली नाही. परिणामी महावितरणचे अधिकारी ऐकणार तरी कोणाचे असाच प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सायंकाळी महावितरणची विशेष बैठक जिल्ह्यातील चार खासदार आणि पाच आमदारांच्या विशेष उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे प्रत्यक्ष समजू शकले नसले तरीही याबाबतीत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी ‘नांदेड स्क्रिप्ट’ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले, जिल्ह्यातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाच्या महावितरणशी संबंधित योजना यावर चर्चा करण्यात आली. वीज पुरवठामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. महावितरण संदर्भातील अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीचे निवारण करण्यासाठीही चर्चा करण्यात आली. धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे या बैठकीचा आमचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. स्थानिक प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडविण्यात येतील. राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवरील प्रश्न वरिष्ठ स्तरावर सोडविण्यात येतील. यानंतर आणखी आठ, दहा दिवसात बैठक घेण्यात येईल. जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे याबाबत विचारणा केली असता खासदार चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात विजेची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडत असल्याचे दिसत आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठीच बैठक घेण्यात आली असल्याचेही माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी महावितरण जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, सहअध्यक्ष खा.डॉ अजित गोपछडे, खा. नागेश पाटील आष्टीकर, खा. रवींद्र चव्हाण, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर, आ. श्रीजयाताई चव्हाण, आ. जितेंद्र अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अधीक्षक अभियंता संजय खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, गोविंदराव शिंदे नागेलीकर आदींची उपस्थिती होती.
खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी वीजपुरवठा हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि विकासाचा मुख्य आधार असल्याचे सांगितले. महावितरण सेवा जनतेची सेवा असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट व कडक सूचना या बैठकीत दिल्याचे सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेत नागरिक, शेतकरी आणि वीजग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्पष्ट केले. वीजपुरवठा सुरळीत आणि अखंडित असणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे वीज खंडित होणे, तक्रारींचे प्रलंबित निराकरण, शेती पंपांचा वीजपुरवठा तसेच स्थानिक पातळीवरील विविध अडचणी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर वेळेत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नांदेड जिल्ह्यातील वीजसेवा अधिक सक्षम, सुरळीत आणि दर्जेदार करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने पुढे नेल्या जातील असेही आ.कल्याणकर यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
नांदेड जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत मतदारसंघातील विविध विजविषयक अडीअडचणी व समस्यांवर सविस्तर चर्चा केली. क्षेत्रातील प्रलंबित वीज जोडण्या, ट्रान्सफॉर्मर समस्या, सुरळीत वीज पुरवठा आणि नागरिकांच्या इतर तक्रारींबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.
या बैठकीमुळे आगामी काळात विजेचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा नांदेडकर बाळगत आहेत. दुसरीकडे नांदेडचे निवडून आलेले खासदार प्रा रवींद्र चव्हाण यांच्यासह नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, कंधार- लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भोकरच्या आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांच्यासह नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांनीही या बैठकीचे काही फोटो समाजमाध्यमावर शेअर करीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची वीज प्रश्नांवर सकारात्मक बैठक झाल्याचे सांगितले आहे. महावितरण आणि लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे.



