क्राईम

नांदेडमध्ये पुन्हा एकदा वाळू माफिया उतरले गोदापात्रात..!

स्थानिक गुन्हा शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई, २ कोटी २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, ७ परप्रांतीयांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड – जिल्ह्यात वाळू माफियाविरुद्ध खुद्द पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी थेट वाळू घाटावर जाऊन कारवाई करत १३ कोटींचा मुद्देमाल जप्त करून पाच दिवस उलटले नाही तोच वाळूमाफिया पुन्हा एकदा नदीपात्रात उतरले आहेत. शुक्रवारी वाहेगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करताना स्थानिक गुन्हा शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाच मोठ्या बोटी, तीन इंजिन, तीन छोट्या बोटी, ३७ तराफे आणि ३० ब्रास रेती असा एकूण २ कोटी २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सात परप्रांतीय मजुरांचाही समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत वाहेगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यावर धाड टाकण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथक विष्णुपुरी बीट हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी वाहेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात काही वाळू माफिया लोखंडी बोट तराफे आणि इंजिनच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करत होते. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. या कारवाईत तीस लाख रुपये किमतीची प्रत्येकी एक मोठी लोखंडी पोट अशा पाच बोटी पकडून जिलेटीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आल्या. तीन छोट्या बोटी, रेती उपसा करणारे तीन इंजिनही नष्ट करण्यात आले तसेच तरंगणारे तराफे आणि त्यावरील ७४ ब्रास रेती पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात २ कोटी २९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, उपनिरीक्षक साईनाथ भुजबळ, उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दासरे, पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, सोनसळे, कदम, शेख, राठोड, कलंदर, यादव, बोधगिरे, जाधव, हराळे, लोणे, घेवारे, अकबर पठाण, संदीप घोगरे नांदेड ग्रामीण ठाण्याचे राजू जंकूट, कारामुंगे, शेख आदींचा समावेश होता.

तीन मुख्य आरोपीवरही गुन्हा दाखल..! पोलिसांची चाहूल लागताच पळून जाणाऱ्या सात परप्रांतीय मजुरांना पोलिसांनी पकडले. त्यांची चौकशी केली असता ते कल्हाळ व भनगी येथील चार मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून अवैध रेती उपसा करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या कारवाईत अल्लाउद्दीन शेख दुखू शेख, खदीर शेख जुलू शेख, अब्दुल वाहिद मरुद्दीन शेख सर्व रा. झारखंड, अखिलेश कुमार धरमदेव राम, उमेशकुमार धरमदेव राम, सुनीलकुमार हरदत्त राम आणि शैलेश कुमार धरमदेव राम सर्व रा.बिहार या सात परप्रांतीयावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी रेती उपसा करण्यास सांगणारे मुख्य आरोपी मधुकर कळके रा. कल्लाळ, बालाजी कळके राहणार कल्लाळ, पवन मोरे रा. भनगी या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!