महापालिका

…अखेर कौठ्याच्या ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यासह परिचारिकेचीही बदली..!

वैद्यकीय अधिकारी जंगमवाडी तर परिचारिका श्रावस्तीनगर रुग्णालयात, परिचारिकेच्या तक्रारीची महिला तक्रार निवारण समितीकडून चौकशी सुरू

नांदेड – महापालिकेच्या कौठा येथील रुग्णालयात आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर आता त्या वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली जंगमवाडी रुग्णालयात करण्यात आली आहे तर परिचारिकेलाही श्रावस्तीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दोन्ही अधिकारी, कर्मचाऱ्याची बदली झाल्याने कार्यरत स्थानिक कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्याचवेळी परिचारिकेने केलेल्या तक्रारीची महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीकडून चौकशी केली जात आहे. या समितीचा अहवाल आता नेमका कधी येईल याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या कौठा रुग्णालयात आठ ते दहा दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर यांना रुग्णालयातीलच एका परिचारिकेच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. या प्रकरणाची चौकशी महापालिकेत सुरू होती; मात्र या संपूर्ण प्रकरणाला व्हायरल झालेल्या व्हिडिओने वाचा फोडली. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना नाममात्र का होईना कारवाई करणे भाग पडले. प्रारंभी महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा आपल्या स्तरावर प्रयत्न केला होता; मात्र तो यशस्वी झाला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंटूरकर यांची महापालिकेच्या जंगमवाडी येथील रुग्णालयात बदली करण्यात आली आहे तर जंगमवाडी रुग्णालयातील डॉ. कल्याण पवार यांना आता कौठा रुग्णालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ती तक्रारकर्ती परिचारिकाही आता श्रावस्तीनगर येथील रुग्णालयात आपले काम करणार आहे. या परिचारिकेला कौठा रुग्णालयातून हलविण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून प्रशासकीय पातळीवर ही कारवाईची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. त्याचवेळी परिचारिकेने वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. हे प्रकरण आता महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीकडे सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतिमा कदम या आहेत. उपाध्यक्ष म्हणून लीलावती डावरे तर सदस्य सचिव या दैवशाला येवते या आहेत. या समितीमध्ये सदस्य म्हणून शिवकन्या जायेभाये, माधुरी गोरकवाड, साहेबराव ढगे, आशा घुले, किरण ढगे, गंगासागर पांडागळे आणि अशासकीय सदस्य म्हणून अरुणा पुरी या आहेत.

महिला तक्रार निवारण समितीची अध्यक्षाविनाच झाली  होती बैठक..! कौठा प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर महापालिकेच्या तक्रार महिला तक्रार निवारण समितीने नावालाच एक बैठक घेतली. ही बैठक समितीच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीतच पार पडली समिती. अध्यक्षाला या बैठकीची कल्पनाच देण्यात आली नव्हती. ऐनवेळी समिती अध्यक्षांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले; मात्र त्या बैठकीस आल्या नाहीत. त्यामुळे उपस्थित असलेल्या समितीच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली; मात्र या बैठकीत तक्रारकर्त्या परिचारिकेची ना तक्रार होती ना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या समितीला कोणते निर्देश देण्यात आले होते. समितीच्या काही पदाधिकारी सदस्यांनी एकत्रित येत ही बैठक ‘सुमोटो’ घेतल्याची सारवासरव नंतर करण्यात आली. झालेल्या बैठकीतही कोणताही निष्कर्ष निघाला नव्हता. त्यामुळे बैठक झाली कशासाठी हाच मूळ प्रश्न उपस्थित झाला होता. आता महापालिका प्रशासनाने महिला तक्रार निवारण समितीला या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता कुठे परिचारिकेच्या तक्रारीच्या चौकशीला प्रारंभ झाला आहे. ही चौकशी किती दिवसात होईल, याबाबत कोणतीही कालमर्यादा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता महिला तक्रार निवारण समितीच्या चौकशी अहवालाकडे लक्ष लागले आहे. हा अहवाल नेमका येईल कधी हे पहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!