
नांदेड – नांदेडमध्ये रविवारी झालेल्या काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना ‘ लक्ष्य’ करत २४ फेब्रुवारी २०२४ हा मराठवाड्याच्या उत्थानाचा दिवस होता, त्याचवेळी मराठवाड्यासह नांदेडच्या काँग्रेसच्या स्वातंत्र्याचा हा दिवस असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. या टिपणीला आता अशोकराव चव्हाण काय उत्तर देतील याकडे आता लक्ष लागले आहे. आज सोमवारी दुपारी अशोकराव चव्हाण हे नानांच्या टीकेला उत्तर देतील.
शहरातील मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे रविवारी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रमेश चेन्नीथला, यांच्यासह माजी मंत्री, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, खा. वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना लक्ष्य करण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्वच वक्त्यांनी अशोकराव चव्हाण पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसला मराठवाड्यात अच्छे दिन आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रविवारी नांदेडमध्ये झालेला हा मेळावा अशोकरावांना आव्हान देण्यासाठीच होता हे स्पष्ट झाले आहे. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनीही आता काँग्रेसमधील भय संपले असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस भयमुक्त झाल्याने आगामी काळात प्रगतीच्या दिशेने असल्याचे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समृद्धी महामार्गातील समृद्धीचा विषयही ऐरणीवर घेताना नांदेडमध्ये झालेल्या २००८ मधील गुरु- ता-गद्दी सोहळ्याचा हिशोबही मागितला आहे. दोन हजार कोटीमध्ये संपूर्ण शहर चकचकीत झाले असते; मात्र आज शहराची अवस्था पाहता निधी नेमका गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. समृद्धी महामार्गात राजकीय लोकांची समृद्धी झाल्याचे सांगताना राज्यात सत्तेवर आल्यावर आल्यानंतर समृद्धी महामार्गाबाबत श्वेतपत्रिका काढली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आजही गावागावात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना अडवले जात आहे. इतरांना का अडवले जात नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या संपूर्ण भाषणादरम्यान मंचावर उपस्थित असलेल्या माजी मंत्री डी. पी. सावंत यांनाही काही शब्दबाण सहन करावे लागले. त्यांना ते झेलणे भागच होते. मात्र डीपींची पुढील वाटचाल ही खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे डी.पीं.नी काँग्रेसमध्ये काम करायचे असल्यास आपले जुने मार्गदर्शक, मित्र अशोकराव चव्हाण यांच्याशी संबंधित सर्व संस्थांच्या पदांचा राजीनामा देऊन मगच काँग्रेसमध्ये काम करावे असा थेट सल्लाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात डी.पी. सावंत हे संस्था की राजकारण या नव्या पेचात अडकले आहेत.
एकूणच रविवारी झालेल्या या सर्व मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी चार वाजता अशोकराव चव्हाण यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधण्याचे निश्चित केले आहे. या संवादादरम्यान रविवारच्या मेळाव्यातील आरोपावर माजी मुख्यमंत्री चव्हाण हे नेमके काय बोलतात याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.