
नांदेड – नांदेड मधील आंबेडकरी युवा नेते राहुल प्रधान यांनी दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भट घेतली आहे त्या पाठोपात आज नांदेड दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल प्रधान यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. त्यामुळे राहुल प्रधान यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा आता सुरू झाली असून त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे बुधवारी नांदेडमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान ही तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर सपकाळ यांनी थेट शिवाजी नगर येथील राहुल प्रधान यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे आणि सध्या काँग्रेसमध्ये असणारे प्रा. यशपाल भिंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना राहुल प्रधान यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीबद्दल विचारले असता राहुल प्रधान आणि आपण चळवळीतील कार्यकर्ते आहोत. आमच्या दोघांचेही चळवळीतील आणि राजकीय शत्रू एकच आहेत. त्या अनुषंगाने आजच्या भेटीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे ही भेट प्रामुख्याने राजकीय नसल्याचे सांगितले. पण त्याचवेळी त्यांनी राहुल प्रधान यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच सपकाळ यांनी निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर आता राहुल प्रधान यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी प्रधान यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात आहे.