
नांदेड – किनवट येथील भाग्यलक्ष्मी बँकेच्या एटीएममधून आठ ऑगस्ट रोजी १७ लाख ३९ हजार ५०० रुपये लंपास केल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयाची सुई प्रामुख्याने बँकेतील कर्मचाऱ्यांवरच फिरली होती. पोलीस तपासात ही बाब आता स्पष्ट झाली असून बँकेचा कॅशियर, शिपाई आणि एक क्लार्क या एटीएम लुटीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली.
‘ भाग्यलक्ष्मी ‘ महिला बँकेचा क्लार्क रितेश संग्राम विराळे हा या एटीएम लुटीचा प्रमुख मास्टरमाईड असल्याचे पुढे आले आहे. यासाठी विराळेने पैशाची गरज असलेल्या आणि सेवानिवृत्तीस अवघे काही दिवस उरलेल्या भारत देविदास सोनटक्के या बँकेच्या कॅशियरलाही या लुटीत सहभागी करून घेतले. बँकेचा क्लार्क विराळे याने रचलेल्या डावाप्रमाणे बँकेच्या एटीएममधील कॅश काढण्याचे काम बँकेचाच शिपाई गीते नारायण भीमनेन्नीवार यांनी केले. एटीएम मधील ही रक्कम काढताना भीमनेन्नीवार आपण कोणत्याही सीसीटीव्ही येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. यासाठी त्याने एटीएममध्ये जाताना चक्क छत्रीचा वापर करून बँकेतील रक्कम काढली. ही रक्कम काढताना एटीएमला कोणतेही नुकसान न पोहोचविता कॅशियर पासवर्डद्वारे एटीएममधील पाचशे रुपयांच्या ३ हजार ४७९ नोटा म्हणजेच १७ लाख ३९ हजार ५०० रुपये लंपास केले.
एटीएममधील रक्कम काढण्याचा हा डाव यशस्वी झाल्यानंतर या तिघांनी तसेच आणखी संशईत असलेल्या आरोपींनी जवळपास दोन लाख रुपये खाण्यापिण्यावर खर्च केले. इतकेच नव्हे तर या एटीएम लुटीतील पैशातून त्यांनी ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. पोलिसांनी रोख ११ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा १५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनेच्या प्रारंभापासूनच संशयित असलेल्या सर्व बँक कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच बँकेचा शिपाई गीतेश नारायण भीमनेन्नीवार याने एटीएम लुटीचा संपूर्ण डावच पोलिसांपुढे उघड केला. भाग्यलक्ष्मी बँकेचे आणखी काही कर्मचारी या एटीएम लुटीत सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचाही लवकरच शोध घेतला जाईल असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकेस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांचे एक पथक किनवटला पोहोचले होते. सदर पथकाने किनवट येथील तपासी अधिकारी उपनिरीक्षक सागर झाडे आणि इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी बँकेतील शिपाई गीतेश नारायण भीमनेन्नीवार याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा कॅशियर भारत सोनटक्के आणि लिपिक रितेश विराळे यांच्या मदतीने केला असल्याचे कबूल केले. किनवटचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सहकार्य केले.