
नांदेड – ग्रंथालये ही ग्रामीण भागात ज्ञानाची केंद्र आहेत. ग्रंथालयात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे ग्रंथ आता गरजेचे आहेत. ग्रंथोत्सवाने वाचन संस्कृतीचा उत्साह वाढतो, वाचन संस्कृतीचा विकास होतो असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांनी केले. ते नांदेड येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने 16 आणि 17 मार्च रोजी नांदेड ग्रंथोत्सव 2023 आयोजित करण्यात आला होता. या ग्रंथोत्सवाचा समारोप आज 17 मार्च रोजी करण्यात आला. समारोपप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांची अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे, डॉ. यशवंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पहिल्या सत्रात कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. ललिता शिंदे या होत्या. कवी संमेलनात डॉ. निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. अशोककुमार दवणे, पंडित मामा पाटील, प्रभाकर बाबा कपाटे, जाफर शेख आदमपूरकर, ऋतुजा गोळे आलेगावकर, जगदीश गोळे, प्रकाश ढवळे, आनंद पप्पुलवाड, बालिका बरगळ, प्रा. नारायण शिंदे, प्र. श्री. जाधव, जगदीश ढोरे, ऋतुजा मुळे, प्राचार्य अ.वि. कल्याणकर, प्रल्हाद घोरबांड आदींनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर ‘स्पर्धा परीक्षा काळाची गरज’ या विषयावर डॉ. यशवंत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत देशमुख हे होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पालकांनी विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरवणे गरजेचे आहेच, परंतु वैयक्तिक लक्षही पालकांनी द्यावे असा मौलिक सल्ला डॉ. चव्हाण यांनी यावेळी दिला. अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होणारे अधिकारी हे समाजभान असणारे तसेच समाजाप्रती तळमळ ठेवणारे असावेत असे प्रतिपादन केले.
हा दोन दिवसीय ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासचंद्र गायकवाड, अजय वट्टमवार, निर्मलकुमार सूर्यवंशी, संजय पाटील, भानुदास पोवळे, संतोष इंगळे, रा.ना. मेटकर, गजानन कळके, राजेंद्र हंबीरे, संजय सुरनर, गोविंद फाजगे, कुबेर राठोड, सूर्यकांत माली पाटील, कांता सूर्यवंशी, प्रणिता गोणेकर, कुणाल देशमुख, माधवराव जाधव आदींनी परिश्रम घेतले.
ग्रंथोत्सव यशस्वितेसाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी आभार मानले.