साहित्य

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेडहून ग्रंथ दिंडी निघणार

यापूर्वी २०१५ मध्ये घुमान येथील मराठी साहित्य संमेलनातही 'नानक साई'ने काढली होती ग्रंथ दिंडी

नांदेड- सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली येथे होत असून संमेलनासाठी नांदेडहून भक्त नामदेव ग्रंथ दिंडी निघणार आहे.

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तब्बल ७० वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर ह्या संमेलनाध्यक्ष असून पद्मविभूषण खा.शरद पवार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ही माहिती दिली.
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी घुमान येथे २०१५ मध्ये झालेल्या ८८ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर आता दिल्लीत ९८ वे संमेलन भरविले जात आहे.

घुमान साहित्य संमेलनात नांदेडच्या नानक साई फाऊंडेशनला ग्रंथ दिंडी काढण्याचा मान मिळाला होता. घुमान संमेलनात काढलेली ‘भक्त नामदेव ग्रंथ दिंडी’ खूप लोकप्रिय झाली होती. दिल्लीच्या साहित्य संमेलनातही ग्रंथ दिंडी काढण्याची संधी नानक साई फाऊंडेशनला प्राप्त झाली आहे. नानक साई फाऊंडेशन महाराष्ट्र- पंजाब भागात करीत असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याबद्दल साहित्य महामंडळ व सरहद्द संस्थेने समाधान व्यक्त केले आहे. नांदेडहून निघणारी ग्रंथ दिंडी दिल्लीत येऊन मुख्य दिंडीमध्ये सहभागी होणार आहे. ग्रंथ दिंडीमध्ये साहित्यिक व साहित्य प्रेमींनी सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे (९८२३२६००७३) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!