
नांदेड – ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
पाचोळा ही त्यांची सुमारे ५५ वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या कादंबरी प्रचंड गाजली होती. ‘आमदार सौभाग्यवती’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. त्यावर नाटकही आले आहे. चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता. कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथासंग्रहासह शिका तुम्ही हो शिका ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरले.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. यासह अनेक मान-सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे त्यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला होता. तर परभणीतील शिवाजी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक, वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे १९९१ पर्यंत प्राचार्य होते. तर देवगिरी महाविद्यालयातून १९९१ साली ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले होते. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर सिडकोतील अपेक्स रुग्णालय मार्गावरील शिवार या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
आदरणीय बोराडे सर म्हणजे आपल्या मराठवाड्याचं अक्षरवैभव आहे. लिहित्या नवोदितांना त्यांचा मोठा आधार होता. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आम्ही त्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो. तेव्हाचं अगत्य आपुलकी अजूनही आठवते. सरांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खूप दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.
व्यंकटेश चौधरी, साहित्यिक, नांदेड.